नरेंद्र मोदी कधीही संविधान बदलणार नाहीत : मंत्री रामदास आठवले | पुढारी

नरेंद्र मोदी कधीही संविधान बदलणार नाहीत : मंत्री रामदास आठवले

भोपाळ; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानाचे पुजक असून संविधानाचे रक्षक आहेत. संविधानाला नतमस्तक होऊन ते देशाचा कारभार चांगला चालवित आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कधीही संविधान बदलू शकत नाहीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहेत. ते परिपूर्ण असून त्यामुळे भारतीय संविधान कधीही कोणतीही शक्ती बदलू शकत नाहीत. मोदी संविधान बदलतील असा विचार काँग्रेस करित असलेल्या प्रचारावर विश्वास ठेऊ नका. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज भोपाळ येथे केले.

संबंधित बातम्या 

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकित भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची भोपाळमधील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, प्रियदर्शीनी नगर. कोनार या आंबेडकरी बौध्द वसाहतींमध्ये पदयात्रा आणि जाहिर सभा पार पडली. या सभेत रामदास आठवले यांनी हे संबोधित केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मध्यप्रदेश प्रमुख प्रभारी ऐहसान खान, राजेश खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस हे संविधानाच्या मुद्यावर जाणीवपुर्वक आंबेडकरी जनेतीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करित आहेत. भारतीय संविधान हे परिपूर्ण असून ते बदलण्यासारखे नाही. जगातली कोणतीही शक्ती डॉ. बाबासाहेबांनी दिलेले भारताचे संविधान बदलू शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानच्या गौरवासाठी संसदेचे स्वतंत्र अधिवेशन घेतले होते. तसेच देशात २६ नोव्हेंबर हा संविधान गौरवदिन म्हणुन सरकार तर्फे साजरा करण्याची परंपरा नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संविधान पुजक आहेत असे रामदास आठवले म्हणाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महु येथील जन्मभुमिस्मारक (दिल्ली ) येथील २६ अलिपूर रोड येथील निर्वाणभुमी स्मारक, मुंबईतील चैत्यभूमी स्मारक, नागपुरची दिक्षाभुमी, लंडनमधील स्मारक या पंचतीर्थस्थळांचा मोदी सरकारने विकास केला. देशात बौध्द स्थळांना जोडणाऱ्या बुध्दीस्ट सर्कल योजना ही नितीन गडकरी यांनी रस्ते मार्ग मंत्रालयाद्वारे सुरु केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे.

मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण हे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले असून यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशचा विकास होत आहे. आंबेडकरी जनतेने काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले आहे.

Back to top button