पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीप फेक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. (Rashmika Mandanna Viral Video) त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, "मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. एप्रिल २०२३ मध्ये अधिसूचित आयटी नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत." (Rashmika Mandanna Viral Video)
संबंधित बातम्या –
एप्रिल 2023 मध्ये अधिसूचित आयटी नियमांचा हवाला देत केंद्रीय मंत्री म्हणाले, हे प्लॅटफॉर्मसाठी कायदेशीर बंधन आहे. कोणत्याही सोशल मीडिया युजर्सद्वारे चुकीची माहिती पोस्ट केली जाणार नाही याची खात्री करा.
सोशल मीडिया युजर्सने किंवा सरकारद्वारे तक्रार केल्यावर, चुकीची माहिती ३६ तासांच्या आत काढून टाकली जाईल, याची खात्री करा. जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने पालन केले नाही तर, नियम ७ लागू होईल आणि पीडित व्यक्ती आयपीसीच्या तरतुदींनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला न्यायालयात नेऊ शकते. डीपफेक हा चुकीच्या माहितीचा एक नवीन आणि त्याहूनही अधिक धोकादायक आणि हानिकारक प्रकार आहे आणि विविध प्लॅटफॉर्मने त्याचा सामना करणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून रश्मिकाचा चेहरा वापरून एक व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खरा की खोटा हे ओळखता न आल्याने रश्मिकाचाच व्हिडिओ असे समजून हा व्हिडिओ एक्सवर लाखो लोकांनी पाहिला आहे. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या महिलेचा आहे. झारा पटेल लिफ्टमधून बाहेर येतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला Deep Fake तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ करण्यात आले असून झाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. पत्रकार अभिषेक कुमार यांनी हा प्रकार उघकीस आणला आहे. हा व्हिडिओ अनेकांना अक्षेपार्ह वाटला आहे.
हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.