मराठा कुणबी हे क्षत्रिय कसे? ‘पानिपत’कार विश्वास पाटलांनी इतिहासच सांगितला | पुढारी

मराठा कुणबी हे क्षत्रिय कसे? 'पानिपत'कार विश्वास पाटलांनी इतिहासच सांगितला

Vishwas Patil on Maratha Kunbi Reservation | कुणबी मराठ्यांची १६२ आडनावे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा कुणबी हे हाडाचे शेतकरी आहेत, तसेच ते श्रेष्ठ क्षत्रियसुद्धा आहेत, असे लेखक विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. मराठा हे कुणबी आणि क्षत्रीय कसे, हा प्रश्न काही घटकांतून उपस्थित केला जात होता. पण विश्वास पाटील यांनी इतिहासातील दाखले देत मराठा कुणबी हे क्षत्रिय असल्याचे हे दाखवून दिले. (Vishwas Patil on Maratha Kunbi Reservation)

‘एक्स’ वर विश्वास पाटील यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, “कुणब्यांचा भारतीय स्तरावरचा उल्लेख काही ठिकाणी कुर्मी, तसेच कुर्मी क्षत्रिय, कुणबी तसेच दक्षिणेमध्ये कापू तर उत्तर कर्नाटक व बेळगाव भागात कुरवाडी या नावानेसुद्धा केला जातो.”

कुणबी जातीचा इतिहास

पाटील सांगतात, ही जमात उत्तर हिंदुस्थानातून पंधराव्या आणि सोळाव्या शतकात दक्षिण भारतामध्ये आली. त्यांच्या पूर्वजांच्या राजाचे नाव सोमवंशीय राजा सुमित्रा असे असून त्याचा मुलगा ग्रीतमद होता. या राजाने ऋग्वेदाचे लेखन केले. दिल्लीचा इतिहासप्रसिद्ध सम्राट पृथ्वीराज चव्हाण आणि त्याचे वंशज जगतसिंग व जयसिंग हे सारे कुर्मी म्हणजेच कुणबी समाजाचे कीर्तिमान सम्राट होते. (Vishwas Patil on Maratha Kunbi Reservation)

कुर्मी तथा कुणबी यांचे पूर्वज राणावंशी ज्यामध्ये उदयपूरचे राणा प्रताप येतात. महाभारत काळामध्ये कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडलेल्या गंगा सिंहाचे वंशजसुद्धा कुणबी होय असेही पुरावे आहेत. त्याबरोबरच त्यांच्या क्षत्रिय कुळांची यादीही खूप मोठी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पावसाळ्यामध्ये मृग नक्षत्राला भात शेतीची पेरणी करायची आणि दसऱ्याला एकदा धान्य खळ्यात येऊन पडले की , घोडा आणि तलवार घेऊन मोहिमेवर बाहेर पडायचे हा त्यांचा धर्म, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘शेती पिकवली हे पाप’

क्षत्रीय कुणब्यांचे पूर्वापार पाप म्हणजे तलवारीबरोबरच त्यांनी नेहमी शेतीही पिकवली ! तसेच समाजातील इतर सर्व ऐतखाऊ वर्गाला भुके मरू दिले नाही. त्याच पापाची फळे आज क्षत्रिय कुणबी भोगत आहेत, असेही पाटील यांनी उद्वेगाने लिहिले आहे.

सर्वाधिक भरडलेली जमात

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त भरडला गेलेला व आर्थिक दृष्ट्या नागवला गेलेला समाज म्हणजेच महाराष्ट्रातील कुणबी समाज होय. दुर्दैवाची बाब म्हणजे नेहमीच ज्या बहुजन मराठा समाजाने गेल्या 70 वर्षात सत्तेतली सर्वाधिक मंत्री पदे, अधिकार आणि नावलौकिक ज्या सत्ताधाऱ्यांना दिला, त्यांच्याच काळामध्ये कुणबी मराठ्यांना कायदेशीर हक्काला मुकावे लागले, अशी टीका ही त्यांनी केली आहे. विदर्भामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कुणबी मराठा समाज्याच्या नोंदी योग्य वेळी कागदोपत्री दाखल करून घेण्याची समयसूचकता दाखवली, ही आठवणही त्यांनी करून दिली.

नोंदी नसतील तर काय दोष?

कुणबी मराठ्यांची एकूण आडनावे 162 होती. ओठावर पिळदार मिश्या डोक्यावर शेंडी. त्याचप्रमाणे ब्रिटिश कागदपत्रात म्हटल्याप्रमाणे ते husbundsmen होते. पशुपालक होते. शेतीसाठी बैल, कोकणातील बंदरावरून घाटमाथा चडून देशावर करावयाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारे चारण ( शेकडो बैलांची खिलारे), तसेच मोहिमांसाठी घोड्यांच्या पागा, दूधदुभत्यासाठी गाई-म्हशी अशी लाखो जनावरे मराठा कुणबीच पाळत होते. पुढे पशुपालन संपले. सर्वांची गुजराण ही शेतीवर आली. ब्रिटिशांच्या जनगणनेमध्ये कुणबी मराठ्यांच्या लाखो नोंदी आढळत असतील, तर त्यांचे पुढे काय झाले, एखाद्याचे रेकॉर्ड नसेल तर काय दोष, असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा

Back to top button