इस्रायल-हमास संघर्ष : पंतप्रधान मोदींनी केली इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्‍याशी चर्चा | पुढारी

इस्रायल-हमास संघर्ष : पंतप्रधान मोदींनी केली इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्‍याशी चर्चा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल चर्चा केली. दहशतवाद आणि हिंसाचारामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता, सुरक्षा, स्थैर्य राखणे आणि सतत मानवतावादी सहाय्य प्रदान करण्याच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पंतप्रधानपदाचा वर्षाभराचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण, सुरक्षा, आरोग्य आणि इतर क्षेत्रांसह द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचा पुनरुच्चार केला. परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण होण्याच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीचे त्यांनी स्वागत केले.

प्रधानमंत्री मोदी आणि ऋषी सुनक यांनी दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करत संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले. तत्पूर्वी काल संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी इस्रायल-हमास संघर्षाच्या संदर्भात यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली.

हेही वाचा : 

 

Back to top button