

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि डाव्या कालव्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पीएम मोदी यांच्या हस्ते १४ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचा शुभारंभ आज (दि.२६) करण्यात आला. सर्वप्रथम त्यानंतर आयोजित सभेप्रसंगी विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य नेते उपस्थित होते. (PM Modi in Shirdi) मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पीएम मोदींचे स्वागत केले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, दोन उपमुख्यमंत्री यांनी सभेला संबोधित केले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डीतील विविध विकास प्रकल्पांचे देखील उद्धाटन करण्यात आले. यामध्ये शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन (प्रकल्प खर्च- १०९ कोटी), निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण (५१७७ कोटी), राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सांगली ते बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण (११०२ कोटी), जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण (६४० कोटी), कुर्डुवाडी- लातूर रोड रेल्वे विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (२३७ कोटी), मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ (२२१ कोटी), अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रुग्णालय भूमिपूजन (२५.४५ कोटी), राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत अहमदनगर येथील आयुष रुग्णालय उद्घाटन (९ कोटी) अशा एकूण १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला आहे. (PM Modi in Shirdi)
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची स्वतंत्र योजना असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता आज वितरीत करण्यात आला. या योजनांतर्गत देशातील बळीराजाला केंद्राचे ६ हजार रुपये आणि राज्याचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळतील. राज्याच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेसाठी सन २०२३-२४ करिता ६९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, आज या योजनेंतर्गत सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पीएम मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. (PM Modi in Shirdi)
याप्रसंगी आयुष्मान कार्ड व स्वामित्व कार्डचे देखील वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष ५ लाखांपर्यंत आरोग्यकवच मिळते. दरम्यान, १.११ कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ पीएम मोदींच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप देखील पीएम मोदींच्या हस्ते करण्यात आले. (PM Modi in Shirdi)