Delhi Air Pollution : दिल्लीत वायु प्रदूषणाने लोकांचे हाल, हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे | पुढारी

Delhi Air Pollution : दिल्लीत वायु प्रदूषणाने लोकांचे हाल, हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत पोहोचल्याने दिल्ली सरकारची प्रदूषण नियंत्रणासाठी धावाधाव सुरू झाली आहे. याअंतर्गत दिल्लीतील अनावश्यक बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व शाळांमध्ये दोन दिवसांची सुटीही देण्यात आली आहे. यासोबतच, प्रवासासाठी खासगी वाहने टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहनही दिल्ली सरकारने केले आहे. (Delhi Air Pollution)

दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक काही ठिकाणी ४०० च्या पुढे गेला आहे. श्रेणी प्रतिसाद कृती कार्यक्रम ३ नुसार नियमावलीसह काही निर्बंध दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात लागू करण्यात आले आहे. दिल्लीतील शाळांना देखील दोन दिवसांची सुट्टी जाहीर केल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक काही ठिकाणी ४०० च्या पुढे गेला आहे. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून आवश्यकता नसल्यास स्वतःची वाहने रस्त्यावर उतरवु नयेत, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा वापर करावा, आजूबाजूला किंवा तुमच्या परिसरात आग लागल्याचे निदर्शनास आल्यास ग्रीन दिल्ली ॲपवर सूचित करावे, असे आवाहन दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केले आहे. आताची परिस्थिती पाहता शनिवारपर्यंतचे निर्देश देण्यात आले आहे. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारची परिस्थिती पाहुन नवे निर्देश सोमवारी देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत बसेसच्या २४०० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. शटल बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन मार्गावर ही सेवा सध्या सुरू आहे. यामुळे सरकारी कर्मचारी वर्गाने या माध्यमाद्वारे प्रवास करावा, दिल्ली मेट्रोच्या ६० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास न करता या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवास करावा असे आवाहन मंत्री गोपाल राय यांनी केले आहे केले आहे.

स्मॉग टॉवरवरून आरोप प्रत्यारोप :

एकीकडे दिल्लीतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आव्हान सरकारसमोर असताना स्मॉग टॉवरवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीतील स्मॉग टॉवर बंद असल्याच्या कारणावरून दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केंद्र सरकार आणि संबंधीत यंत्रणांना धारेवर धरले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या यंत्रणानी परस्पर निर्णय घेतल्यामुळे स्मॉग टॉवर बंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दिल्लीतील काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्दशांक ७०० पेक्षा जास्त आहे. मात्र दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील स्मॉग टॉवरला दिल्ली सरकारने टाळे ठोकले आहे. दिल्ली सरकार प्रदूषण नियंत्रण कमी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, दिल्लीला गॅस चेंबर बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी केली आहे. (Delhi Air Pollution)

हेही वाचा :

Back to top button