सौदीचा फुटबॉल, गोल्फ पाठोपाठ आता IPL च्या हिस्सेदारीवर डोळा, काय आहे प्रस्ताव? | पुढारी

सौदीचा फुटबॉल, गोल्फ पाठोपाठ आता IPL च्या हिस्सेदारीवर डोळा, काय आहे प्रस्ताव?

पुढारी ऑनलाईन : सौदी अरेबियाने (Saudi Arabia) फुटबॉल आणि गोल्फ या यासारख्या व्यावसायिक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता सौदीची जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) या क्रिकेटमधील सर्वात फायदेशीर इव्हेंटमध्ये अब्जावधी डॉलर्सचा हिस्सा खरेदी करण्याची तयारी केली आहे. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.

संबंधित बातम्या 

आयपीएलचे रुपांतर कंपनीत करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. या कंपनीचे बाजारमूल्य ३० अब्ज डॉलर्स इतके अवाढव्य असणार आहे. यामध्ये सौदी अरेबिया महत्त्वाचा भागीदार बनू शकतो, असा सल्ला सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांच्या काही सल्लागारांनी दिला आहे.

सप्टेंबरमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भारत दौऱ्यादरम्यान यावर चर्चा केली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार, सौदीने आयपीएलमध्ये ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामुळे त्याचा इंग्लिश प्रीमियर लीग अथवा युरोपियन चॅम्पियन्स लीग प्रमाणेच इतर देशांमध्ये विस्तार होण्यास मदत होईल, असे प्रस्ताव त्यांनी पुढे केला होता, असे पुढे सुत्रांनी म्हटले आहे.

सौदी सरकार याबाबत करार करण्यास उत्सुक आहे. या प्रस्तावावर भारत सरकार आणि बीसीसीआय (BCCI) पुढील वर्षीच्या निवडणुकांनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत.

सौदी अरेबियाने याआधी फुटबॉल आणि गोल्फमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता सौदीने आयपीएलमध्ये (IPL) गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच बीसीसीआय अथवा सौदी सरकारने यावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीगंपैकी एक आहे. २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. जगभरातील दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक यामुळे भारताशी जोडले गेले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button