बिहारमध्ये नक्षल्यांचे निर्दयी कृत्य ; चौघांना फासावर लटकवून घर बाँम्‍बने उडवलं | पुढारी

बिहारमध्ये नक्षल्यांचे निर्दयी कृत्य ; चौघांना फासावर लटकवून घर बाँम्‍बने उडवलं

गया (बिहार) ; पुढारी ऑनलाईन

बिहारमधील गया जिल्हा मोठ्या नक्षली हल्‍ल्‍याने हादरला. नक्षलवाद्यांनी एका गावावर हल्‍ला चढवला. यावेळी त्‍यांनी गावातील एकाच कुटुंबातील चार लोकांना ठार केले. यावरच न थांबता नक्षल्‍यांनी या लोकांचे घर बाँम्‍बने उडवून दिले.

एकाच कुटुंबातील चार लोकांना फासावर लटकवले…

ही घटना गया जिल्‍ह्यातील सर्वाधिक नक्षल प्रभावित क्षेत्रातील डुमरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. इथल्‍या मोनबार गावात शनिवारी रात्री नक्षल्‍यांनी हल्‍ला केला.

नक्षल्‍यांच्या निशाण्यावर गावातील सरजू सिंह भोक्‍ता यांचे घर होते. नक्षल्‍यांनी भोक्‍ता यांच्या घराला वेढा घातला. यानंतर घरातील सरजू भोक्‍ता त्‍यांची दोन मुले संत्‍येंद्र सिंह भोक्‍ता, महेंद्र सिंह भोक्‍ता, पत्‍नी या सर्वांना घराबाहेरच फासावर लटकवले.

घराला नक्षल्‍यांनी बाँम्‍बने उडवले…

घरातील चार सदस्‍यांना क्रुर पध्दतीने फासावर लटकवल्‍यानंतर निर्दयी नक्षल्‍यांनी त्‍यांचे घरही बाँम्‍बने उडवून दिले. यानंतर नक्षलवाद्यांनी गावात एक चिठ्ठी सोडली आहे.या चिठ्ठीत लिहले आहे की, भोक्‍ता कुटुंबातील लोकांनी चार नक्षल्‍यांना काही दिवसांपूर्वी विष देवून मारून टाकले होते असा दावा नक्षल्‍यांनी केला आहे.

मारल्‍या गेलेल्‍या उमरेश कुमार, सीता कुमार, शिवपूजन कुमार आणि उदय कुमार यांच्या नावाचा या चिठ्ठीत समावेश आहे.

घटनास्‍थळावर पोलिस पोहोचले…

या मोठ्या घटनेने जिल्‍हा हादरून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्‍थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्‍णालयात पाठवले. यावेळी नक्षल्‍यांची चिठ्ठी जप्त करण्यात आली. या घटनेनंतर नक्षली जंगलात पळून गेले.

Back to top button