लग्नपत्रिका तब्बल चार किलो वजनाची | पुढारी

लग्नपत्रिका तब्बल चार किलो वजनाची

अहमदाबाद : लग्नाचा थाट पाहायचा असेल तर तो भारतातच पाहावा. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत ‘लग्न’ म्हटलं की आपापल्या परीने थाटमाट केला जातोच. त्यामध्ये लग्नपत्रिकेपासून वरातीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. लग्नात अत्यंत महागड्या व वेगळ्या लग्नपत्रिका ही तयार करण्यात आलेल्या आहेत.

मुकेश अंबानी यांच्या चिरंजीवाच्या लग्नाची पत्रिकाही चर्चेत आली होती. आताही अशीच एक लग्नपत्रिका लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही लग्नपत्रिका गुजराती व्यापारी मुलेशभाई उकनी यांच्या मुलाच्या लग्नाची असून ती तब्बल 4 किलो वजनाची आहे!

फिकट गुलाबी रंगाची ही लग्नपत्रिका म्हणजे खरे तर एक सुंदर बॉक्सच आहे. या बॉक्सवर भगवान द्वारकाधीशांचे म्हणजेच श्रीकृष्णांचे सुंदर चित्र दिसते. बॉक्समध्ये मलमलच्या कापडाच्या चार लहान पेट्या दिसतात. या पेट्यांमध्ये सुका मेवा भरलेला आहे. या पत्रिकेचे वजन 4 किलो 280 ग्रॅम आहे. एका लग्नपत्रिकेची किंमत सात हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्यक्ष पत्रिकेमध्ये एकूण सात पाने आहेत. यामध्ये तीन दिवसांच्या विवाह कार्यक्रमाचा तपशील लिहिण्यात आला आहे. ही पत्रिका काजू, बेदाणे, बदाम, चॉकलेटस् भरलेल्या पेटीसह देण्यात आली आहे. हा लग्नसोहळा 14 नोव्हेंबरपासून राजस्थानच्या जोधपूर शहरात होणार आहे.

Back to top button