सिंहायन आत्मचरित्र : छत्र हरपले! | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : छत्र हरपले!

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

मातेच्या मायेची ऊब आणि पित्याची छत्रसावली, यामध्येच माणसाचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. माझ्या नशिबानं मला माझ्या आईंच्या मायेची ऊब दीर्घकाळ लाभली आणि पित्याची छत्रसावली तर माझ्यासाठी संजीवनीच ठरली. मोठ्या वृक्षाखाली लहान रोपटे कधीच वाढत नाही, ते खुरटते, असं नेहमीच म्हटलं जातं. पण त्याला मी अपवाद होतो. माझे आबा म्हणजे एक महावृक्षच होते. त्यांच्या सावलीमध्ये माझं व्यक्तिमत्त्व खुरटायचीच अधिक शक्यता होती. पण आबांनी तसं होऊ दिलं नाही. त्यांनी मला आपल्या छत्रछायेखाली वाढवलं जरूर; परंतु माझं व्यक्तिमत्त्व खुरटणार नाही, याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. मी वाढावं, फुलावं, बहरावं, वेळप्रसंगी त्यांच्यापेक्षाही उंच भरारी घ्यावी, अशीच त्यांची मनोकामना होती. ते त्यांचं स्वप्न होतं.

आणि म्हणूनच ‘पुढारी’ची पालखी मोठ्या विश्वासानं माझ्या खांद्यावर देऊन ते निश्चिंत झाले. ती पालखी मी संपूर्ण ताकदीनिशी पेलतो आहे, हे पाहून त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला. ‘पुढारी’चा विस्तार, माझी घोडदौड आणि आपल्या परिवाराचा विकास पाहताना आबांना धन्य धन्य झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या चांगल्या कामाचं कौतुक ते तोंडभरून करीत होते आणि त्यांची पाठीवर पडणारी कौतुकाची थाप पाहून, माझ्या अंगावर मूठभर मांस चढत होतं. वडिलांच्या नजरेत आपण मोठं होत आहोत, याचा मला जरूर अभिमान वाटत होता. पण त्याचा गर्व माझ्या मनाला कधीच शिवला नाही.

मुळात आबांचा द़ृष्टिकोन हाच मुळी सामाजिक आणि पुरोगामी विचारसरणीचा होता. बहुजन समाज प्रबुद्ध झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. ‘आपल्यातल्या कर्तृृत्ववान माणसांना आपण अधिक मोठं केलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे’, हा त्यांचा ध्यास होता आणि या ध्यासातूनच त्यांनी बहुजन समाजातील नेत्यांना ताकद दिली. ‘पुढारी’ त्यांच्या पाठीशी उभा केला. याच भावनेतून त्यांनी पत्रकारांच्या लेखण्यांनाही आकार दिला. नवनवीन पत्रकार घडवले.

मग मी तर त्यांचा मुलगाच होतो. त्यामुळे त्यांना माझ्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या आणि त्या माझ्याकडून पुर्‍या होत असल्यामुळे ते समाधानी होते. ते माझ्या तोंडावर माझं जेवढं कौतुक करायचे, त्यापेक्षा माझ्या पाठीमागे माझी जास्त प्रशंसा करायचे. त्याचं मलाही समाधान वाटत होतं आणि अधिक पराक्रम करण्यासाठी माझे बाहू सदैव स्फुरत होते.

आबांचा परिवारही तसा फारच मोठा होता. जंबो फॅमिलीच होती जणू! त्यांना सहा लेकी म्हणून सहा जावई आणि त्यांचे परिवार. तसेच आत्या, मावशी व त्यांचे परिवार. त्यात आता माझा संसारही फुलला होता. घरात बागडणार्‍या नातवंडांमुळे घराचं ‘गोकुळ’ झालं होतं. माझी व सहा बहिणींची मुले असा आबांचा नातवंडांचा मोठा गोतावळा होता. ते या सर्व नातवंडांबरोबर गप्पा मारायचे. त्यांना घेऊन फिरायला जायचे. माझी मुलगी शीतल व मुलगा योगेश यांना ते शीतला व योगेशा असे कौतुकाने हाक मारायचे. आयुष्याच्या शेवटी बालगोपालांच्या या गोकुळात ते रममाण झाले होते. आबांना आता कसलीच चिंता राहिली नव्हती. ते कृतार्थ झाले होते.

आबा पूर्वायुष्यात निरीश्वरवादी होते. पूर्णपणे नास्तिक. कारण त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचा पगडा होता. एका अर्थानं ते सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यूच होते. त्यामुळे त्यांचा देव, भूत किंवा भविष्यावर मुळीच विश्वास नव्हता. परंतु, आयुष्याच्या संध्याकाळी मात्र ते तितकेसे नास्तिक राहिले नव्हते. त्यांच्यातला हा बदल मला सर्वप्रथम जाणवला तो पंढरपूरच्या भेटीवेळी.

एकदा आम्ही सर्व जण पंढरपूरला गेलो होतो. आबाही सोबत होतेच. तिथं गेल्यावर लक्षात आलं की, पांडुरंगाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होती. चार-पाच तास पाळीत उभं राहून दर्शन घेणं आबांना पटणारं नव्हतं. मुळात आबा दर्शनाला आत येतात की नाही, आले तर पांडुरंगाला नमस्कार करतात की नाही, हा प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होता आणि झालंही तसंच! ती गर्दी पाहून आबा म्हणाले,
“आपण शिखर दर्शनच घेऊ झालं! गर्दीत दर्शन होणं अवघड आहे.”

आणि खरोखरीच शिखराचं दर्शन घेऊन आम्ही माघारी वळलोही. परंतु, त्याचवेळी एक पोलिस इन्स्पेक्टर गर्दीतून वाट काढीत आमच्या दिशेनंच आला. ओळख असल्यासारखा तो आबांना नमस्कार करून म्हणाला,
“दर्शनासाठी थांबलात का? चला, मी सोडतो तुम्हाला आत!”
“पण मी आपल्याला ओळखलं नाही!” आबा म्हणाले.
“मी इन्स्पेक्टर काळे! या असे माझ्या मागून!”
असं म्हणून तो चालू लागला. आम्ही सर्व त्याच्या मागून जाऊ लागलो. त्यानं आम्हाला व्ही.आय.पी. दर्शन मार्गातून आत सोडलं. आम्ही त्या दिवशी अगदी मनोभावे विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. विठ्ठलाच्या दर्शनानं आबांना तर अतीव आनंद झाला.

‘माझे मन पाहें कसून ।
चित्त न ढळे तुजपासून ।’

अशी आबांची अवस्था झाली होती आणि त्यांचं हे भक्तिरूप मी प्रथमच अनुभवत होतो.
दर्शन घेऊन बाहेर येताच त्या पोलिस इन्स्पेक्टरचे आभार मानण्यासाठी आम्ही त्याला शोधू लागलो. पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. अखेर आम्ही तिथल्या पोलिस ठाण्यातही चौकशी केली. पण काळे नावाचे कुणी इन्स्पेक्टरच नसल्याचं तिथं आम्हाला सांगण्यात आलं! त्यावर आबांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. ते हात जोडून म्हणाले,
“हे तर देवानेच घडविले!”
आणि एवढ्यावरच न थांबता त्यांच्या मुखातून संत तुकारामांच्या अभंगाच्या चार ओळी अगदी अभावितपणे बाहेर पडल्या,

‘आवडी न पुरे सेवितां न सरे।
पडियेले धुरे सवे गांठी।
न पुरे हा जन्म हे सुख सांठितां।
पुढतीही आता हेंचि मागों॥’

श्रीहरीची गाठ पडली म्हणून त्याच्याविषयीचं प्रेम काही संपत नाही. उलट त्याच्या दर्शनाची तृष्णा अधिकच बळावते. हरीचं हे सुख हृदयात साठविण्यासाठी हा एक जन्म पुरेसा नाहीच! त्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील!
आबांचा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे झालेला हा प्रवास फारच विलोभनीय होता आणि त्या परिवर्तनाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं, हे माझंही सुदैवच!
‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ अशा संत जनाबाईंच्या अभंगाच्या पंक्ती आहेत. त्याप्रमाणे माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी त्याची नाळ जिथं पुरलेली असते, तिथं तो पुनःपुन्हा माघारी आल्याशिवाय राहात नाही. मग आबाही त्याला अपवाद कसे असतील?

गगनबावडा हे आबांचं जन्मगाव. आबांना गगनबावड्याचं प्रचंड आकर्षण होतं. कामाचा व्याप सांभाळूनही ते अधूनमधून विश्रांतीसाठी म्हणून गगनबावड्याला जाऊन राहात असत. गगनबावड्याला एक उत्तम स्थितीतील लायब्ररी होती. एका अर्थानं आबाच तिचे आश्रयदाते होते. कारण ‘पुढारी’ला भेटीदाखल येणारी अनेक पुस्तकं ते या लायब्ररीला भेट म्हणून देत असत. मग गगनबावड्याला गेले की, त्याच लायब्ररीतून पुस्तकं घेऊन ते तिथे निवांतपणे वाचत असत. श्रीयुत चिकनीस नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांच्या दुकानात बसून राजकारणापासून समाजकारणापर्यंत गप्पा मारण्यात आबांना एक वेगळाच आनंद मिळत असे. तसेच सरपंच बंडोपंत पोळ आणि गैबी हे आणखी दोन त्यांचे जिवलग मित्र. त्यांच्याबरोबर गप्पांची मैफल रंगवण्यात वेळ कधी निघून जाई, हे त्यांचं त्यांनाच समजत नसे. तिथून परतताना त्यांचं मन खट्टू होई. आयुष्याच्या अखेरपर्यंत पंढरीच्या वारकर्‍यासारखे आबा गगनबावड्याची वारी करीतच राहिले.

त्यांनी घालून दिलेला परिपाठ मग मीही तसाच पुढे चालू ठेवला. दर मे महिन्याच्या सुट्टीत सार्‍या परिवाराला घेऊन मीही गगनबावड्याला जायचा क्रम कायम ठेवला. आमच्या जंबो कुटुंबात सुमारे चाळीस ते पन्नास सदस्य होेते. त्या सर्वांना सोबत घेऊनच आमचा मुक्काम तिथल्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात किमान पंधरा-वीस दिवस तरी पडत असे. तसेच पीडब्ल्यूडीच्या रेस्ट हाऊसमध्येही आमचा कॅम्प पडत असे. एक प्रकारे ते आमच्या कुटुंबाचं वार्षिक स्नेहसंमेलन साजरं होत होतं. आबांचं गगनबावड्यावर नितांत प्रेम होतं. त्यांचं ते प्रेम मीही जपलं.

माझं लग्न झाल्यापासून माझ्यावर ‘निर्णयसागर’च्या प्रकाशनाची जबाबदारी पडली आणि मी काही काळ मुंबईतच अडकून पडलो. माझ्यासोबत त्यावेळी अ. ब. करवीरकर, पी. जी. कुलकर्णी, देशपांडे आदी मंडळी मुंबईला आली होती. हे लोक अधूनमधून कोल्हापूरला येत असत. त्यावेळी आबा त्यांना पुनःपुन्हा विचारत असत की,
“बाळ परत कधी येणार आहे?”

त्यांच्या या विचारपुशीवरून माझ्या लक्षात येई की, आबांनी माझ्या वाटेकडे डोळे लावले होते. आपला मुलगा आपल्याजवळ असावा, असं त्यांना मनोमन वाटत होतं. पण मी ‘निर्णयसागर’च्या कामात असा काही गुंतून पडलो होतो, की इच्छा असूनही मला माघारी येता येत नव्हतं!
– आणि मग ध्यानीमनी नसतानाच ती घटना घडली.

त्या दिवशी आबा बेळगावहून कोल्हापूरला निघाले होते. गाडी निपाणीजवळ आली नसेल तोच त्यांच्या छातीत दुखू लागले. सुरुवातीला त्यांनी ते गंभीरपणे घेतलं नाही. परंतु, जसजशी कळांची तीव्रता वाढू लागली, तसं निपाणीमधल्याच एका डॉक्टरच्या दवाखान्याकडे गाडी घेतली. तिथं ई.सी.जी. काढल्यानंतर आबांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याचं निष्पन्न झालं. त्यांना ताबडतोब कोल्हापूरला आणून डॉ. एस. आर. पाटील यांच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यात आलं.

सौ. गीतादेवी यांनी ही बातमी मला फोनवरून कळवली. तसा मी त्या रात्रीच कोल्हापूरला निघालो. आबांना हृदयविकाराचा त्रास होतोय, हे ऐकूनच माझ्या काळजात धस्स झालं होतं. काही झालं तरी आबा ही माझ्या मर्मबंधातली ठेव होती. कोल्हापूरला पोहोचताच मी सकाळी सकाळीच थेट डॉ. एस. आर. पाटलांचं हॉस्पिटल गाठलं. आबांना दवाखान्यातल्या बेडवर पेशंट म्हणून झोपलेलं बघून माझ्या अंतःकरणात कालवून आलं. आबांची झोप लागली होती; पण माझ्या चाहुलीनं ते जागे झाले. जणू ते माझीच वाट बघत होते.
“लवकर आलास?” मंद स्मित करीत त्यांनी विचारलं.
“तुम्हाला बरं नाही, हे समजल्यावर मी कसा थांबेन आबा?”

क्षणभर आबा काहीच बोलले नाहीत. कधी कधी नि:शब्दताही बरंच काही बोलून जात. आबांच्या नेत्रांच्या कडा किंचित ओलावल्यासारख्या वाटल्या, की माझेच डोळे ओलावल्यामुळे मला तसं वाटलं कुणास ठाऊक! पण माझा हात आपल्या हाती घेत, ‘या देहीचे त्या देही’ ठेवल्यासारखे आबा मला म्हणाले,

“मला अजून दहा वर्षे तरी काही होणार नाही! तू काळजी करू नकोस!”
“तुम्ही मला शंभर वर्षे हवे आहात, आबा!” मी सद्गदित कंठानं म्हणालो.
आबांना थोडा आराम पडल्यावर आम्ही त्यांना डिस्चार्ज घेऊन घरी आणलं. त्यानंतर खरोखरच आबांची तब्येत दहा वर्षे फारच चांगली होती. मिरजेच्या सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सोरटूर यांना दाखवलं.
“त्यांना छातीमध्ये पेसमेकर बसवावा लागेल; पण आमच्याकडे अ‍ॅटोमॅटिक पेसमेकर नाही. तो बाहेरून मागवावा लागेल!”
आबांना तपासून डॉ. सोरटूर यांनी सल्ला दिला. पेसमेकरबद्दल त्यांनी आम्हाला सविस्तर माहितीही दिली.
“पेसमेकरमुळे रक्तदाब वाढला तरी तो कमी-जास्त करता येतो. आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे ब्लडप्रेशर कमी-जास्त करणं, हेच पेसमेकरचं काम असतं.”

डॉ. सोरटूर यांचा सल्ला येताच मी तातडीनंच परदेशातून पेसमेकर मागवून घेतला. परंतु, आबांना पेसमेकर मुंबईत नेऊन बसवावा, अशी माझी इच्छा होती. पण आबा काही केल्या मुंबईला यायला तयार नव्हते. अखेर मिरजेमध्येच डॉ. सोरटूर यांच्याकडे पेसमेकर बसवण्याचं निश्चित झालं. आबाही मिरजेला यायला तयार झाले. ठरल्याप्रमाणे मी आबांना मिरजेला घेऊन गेलो. माझ्यासोबत काही नातेवाईक आणि सहकारीही होते. आबांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करून आम्ही सर्व जण मिरजेच्या सर्किट हाऊसमध्ये मुक्कामाला थांबलो. कारण ऑपरेशन दुसर्‍या दिवशी होणार होतं.

दुसर्‍या दिवशी सकाळी आबांना ऑपरेशन टेबलवर घेतलं. आम्ही सर्व जण थिएटर बाहेर उभे होतो. थिएटरच्या दारावरचा लाल दिवा ऑन होताच माझं हृदय दुपटीनं धडधडू लागलं. एक एक सेकंद एक एक तासासारखा भासू लागला. जसा वेळ लागेल तसा जीव टांगणीला लागू लागला. मनात शंकेची पाल चुकचुकू लागली.

अखेर तो लाल दिवा विझला आणि क्षणभरानं डॉ. सोरटूर पडलेल्या चेहर्‍यानंच बाहेर आले. त्यांनी माझ्याकडे येण्याआधीच मी त्यांच्याकडे धाव घेतली.

“काय झालं?” माझाच आवाज मला काळजीयुक्त वाटला.
“ऑपरेशन यशस्वी झालं! पण…” डॉ. सोरटूर चाचरत म्हणाले.
“पण काय? आबा ठीक आहेत ना?” मी जवळजवळ ओरडलोच.
“आबा ठीक आहेत! पण वेगळाच प्रॉब्लेम झालाय!” डॉ. सोरटूर उत्तरले.
“कसला प्रॉब्लेम डॉक्टर? थोडं स्पष्ट बोलाल का?” मी विचारलं.

“व्हॉट हॅपण्ड मिस्टर जाधव…” डॉ. सोरटूर सांगू लागले, “आपण परदेशातून मागवलेला मॉडर्न पेसमेकर आम्ही पहिल्यांदाच हाताळत होतो. आम्ही तो हार्टला जोडला आणि त्याची वायरही बसवली. त्यानंतर त्यावर एक स्कू्र असतो. तो पिळून घट्ट बसवायचा असतो. त्यानुसार आम्ही वायर घालून तो स्क्रू घट्ट पिळलाही. पण नंतर लक्षात आलं, की वायर नीट बसलीच नव्हती! या पेसमेकरची सिस्टीमच अशी आहे, की एकदा स्क्रू बसवल्यानंतर तो पुन्हा काढताच येत नाही. साहजिकच पेसमेकर बसवलाच गेला नसल्यामुळे रक्तदाब व्यवस्थित होत नव्हता! त्यामुळे तातडीनं निर्णय घेऊन आम्ही आमच्याकडचा उपलब्ध असलेला पेसमेकर बसवून टाकला.”

डॉ. सोरटूर यांचं बोलणं ऐकून मी स्तंभितच झालो. मला काय बोलावं, तेच कळत नव्हतं. आईच्या गुडघ्याच्या बाबतीत जी चूक झाली होती, तीच चूक आता आबांच्या स्पेसमेकरच्या बाबतीत झाली होती! हे असं नेमकं माझ्या बाबतीतच का घडतं, हेच मला कळत नव्हतं! शून्यवत अवस्थेत मी बराच वेळ तिथेच बसून राहिलो.

डॉक्टरांनी नाईलाजास्तव ऐनवेळी घेतलेला निर्णय योग्यच होता. परंतु, परदेशातून मागवलेला पेसमेकर जर काळजीपूर्वक बसवला गेला असता, तर आबांना नंतर जो त्रास सोसावा लागला, तो लागला नसता. त्यांच्या शरीराच्या मागणीप्रमाणे ब्लडप्रेशर कमी-जास्त झाले असते आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य आणखी काही वर्षांनी तरी वाढलं असतं, असं मला आजही वाटतं.

ऑपरेशननंतर आबा नेहमीप्रमाणे हिंडू-फिरू लागले. नित्यनेमानं ‘पुढारी’ कार्यालयात हजेरी लावू लागले. काही वर्षे निश्चितच चांगली गेली. आबांना पहिल्यापासून विडी पिण्याची सवय होती. लिखाणाच्या वेळी त्यांच्या एका हातात विडी आणि दुसर्‍या हातात लेखणी, असं चित्र असायचं. कित्येकदा मी किंवा माझी एखादी बहीण त्यांच्याकडून डिक्टेशन घेत असे, तेव्हाही आबा विडीचा झुरका घेतच डिक्टेशन द्यायचे.

गमतीची गोष्ट म्हणजे त्यांचा मित्र परिवारही विडी, सिगारेटचा मोठा शौकीन होता. त्यांच्या जवळच्या मित्रांपैकी कंगुरीअण्णा, देवचंद शहा यांना नेहमी विडी लागायची. त्यांना व्यसनच होतं म्हणा ना! तसेच सर्जेराव पाटील, व्ही. टी. पाटील यांच्यासारख्या मित्रांना सिगारेट आवडायची. आबा मुंबईला होते तेव्हाही त्यांच्या सहवासातील मामा वरेरकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही विडी पिण्याचा नाद होता. खरं तर, त्या काळात धूम्रपान करणं प्रतिष्ठेचंच मानलं जात होतं.

सिगारेट व्यतिरिक्त शिक्षणतज्ज्ञ व मौनी विद्यापीठाचे जे. पी. नाईक यांच्या खिशात नेहमीच शेंगदाणे-फुटाणे असायचे. ते घरी आले की मला नेहमी खिशातून फुटाणे काढून द्यायचे. अशा गमतीशीर आठवणींचा मीही साक्षीदार आहे.

परंतु आबांच्यावर विडीचा नाही म्हटलं तरी चांगलाच दुष्परिणाम झाला होता. त्यातील निकोटिनमुळे त्यांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या होत्या. त्यामुळेच शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नव्हता. दुर्दैवानं त्यावेळी विज्ञान इतकं पुढं गेलेलं नव्हतं. त्यावेळी अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीची सुविधा असती, तर आबा जास्त काळ जगले असते. अखेरची दहा-बारा वर्षे आबांनी विडी सोडली होती. मात्र, धूम्रपानानं जे व्हायचं ते नुकसान त्या आधीच झालं होतं.

त्यातच आबांना मधुमेहाचाही त्रास सुरू झाला होता. त्यामुळे गोड पदार्थ खाणे त्यांनी पूर्णपणे बंद केले. त्यांना आंबे तर खूपच आवडायचे. पण मधुमेहानं त्यांनी आंबे खाणे कायमचे बंद केले. आबा एक तपस्वी होते. एकदा निर्णय घेतला की ते मागे फिरत नसत. आबांचं स्वतःच्या मनावर खूपच नियंत्रण होतं. पथ्यपाणी पाळण्यात ते काटेकोर होते. ठरवूनच त्यांनी गोड न खाण्याचा निर्णय शेवटपर्यंत पाळला. त्यांना लोणी लावलेला बनपाव आणि दूध फार आवडायचं. ते मात्र त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही.

अखेरच्या दिवसांत आबांना जणू काही आपल्या प्रस्थानाची चाहूलच लागली होती. त्यांनी आपल्या सार्‍या मुलींना पत्रं पाठवून बोलावून घेतलं. त्यांच्याशी मनमोकळेपणानं गप्पागोष्टी केल्या. नातवंडांचे लाड पुरवले. आईला एका पायाचं दुखणं आधीपासूनच होतं. त्यातच तिला अर्धांगवायू झालेला. ती अंथरुणावर झोपूनच होती. तिच्यासाठी चोवीस तास नर्सिंगची व्यवस्था केली होती. परंतु, आबा तासन्तास तिच्याजवळच बसून राहात होते. जणू ते तिचा मूक निरोपच घेत होते!

प्रस्थानाला जाण्यापूर्वी दोन दिवस आधी ते ‘पुढारी’ ऑफिसमध्ये आले. आपल्या खुर्चीवर समाधानानं जाऊन बसले. सर्व कर्मचारी वर्गाला बोलावून त्यांची आस्थेवाईकपणे ख्याली-खुशाली विचारली. प्रत्येकाला ते एकच गोष्ट पुनःपुन्हा सांगत होते.

“माझ्या पश्चात ‘पुढारी’ व्यवस्थित चालवा! माझ्या बाळकडे लक्ष द्या!”
ही त्यांची निरवानिरवीची भाषा ऐकून कर्मचारीही भावविवश होऊन गेले होते.
त्याच दरम्यान आबांचे मित्र बाबूराव पाटील बुदिहाळकर त्यांना भेटायला आले. निरोप घेताना ते आबांना म्हणाले,
“मला थोडं बोलायचं आहे! मी आता मुंबईला निघालोय. चार दिवसांनी परत येतोय. आलो की भेटतो!”
त्यावर आबा त्यांना म्हणाले, “बाबूराव, चार दिवसांनी मी नाही!”
“कुठे गावी जाणार आहात काय?” बुदिहाळकरांनी विचारलं.
“नाही. मी आता अखेरच्या प्रवासालाच निघणार आहे!” आबा शांतपणे उद्गारले.
आबांच्या या उत्तरानं बुदिहाळकर बुचकळ्यात पडले.

आबांच्या निधनानंतर बुदिहाळकर मला भेटायला आले, तेव्हा त्यांनी मला ही आठवण सांगितली. ते ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले. याचा अर्थ आबांना केवळ आपल्या मृत्यूची चाहूलच लागली नव्हती, तर किती दिवसांत आपण प्रस्थान करणार आहोत, हेही त्यांना ठाऊक झालेलं होतं!

आबा नेहमी पंचगंगा नदीवरच्या शिवाजी पुलावरून पन्हाळ्याच्या रस्त्यानं फिरायला जात असत. ही त्यांची प्रभातफेरी कित्येक वर्षांपासून अखंडितपणे चालू होती. त्यांचा मॉर्निंग वॉकचा एक ग्रुपच होता. अलीकडच्या काळात या त्यांच्या मित्रमंडळींमध्येही त्यांनी साधारणतः निरोपाचीच भाषा सुरू केली होती. त्यामुळे त्यांचे मित्रही गडबडून गेले होते. अधिक खोलात जाऊन विचारले, तर आबा हसत हसत तो विषय बाजूला सारत असत.

परंतु, आबांनी प्रस्थानाची वेळ नि तारीख मनाशी जणू निश्चितच केली होती आणि त्यांच्या त्या निश्चयाला जणू त्यांचं शरीरही त्यांना तसंच प्रतिसाद देत होतं की काय कोण जाणे? कारण दिवसेंदिवस त्यांच्या रक्तवाहिन्या बारीक होत चालल्या होत्या. त्यांचा रक्तदाबही स्थिर राहात नव्हता. एके दिवशी रात्री त्यांच्या छातीत पुन्हा वेदना होऊ लागल्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. ब्लडप्रेशर एकाएकी चांगलंच वाढलं. माझ्या मनाची पाल चुकचुकली. काहीतरी त्वरित करणं भाग होतं आणि मी ते केलं!

माझ्या गाडीत आबांना घालून स्वतःच ड्रायव्हिंग करीत, मी त्यांना रुईकर कॉलनीतील डॉ. दिलीप कुलकर्णींच्या दवाखान्यात नेऊन अ‍ॅडमिट केलं. ताबडतोब मिरजेच्या डॉ. सोरटूरना फोन लावला आणि त्यांना आबांची तब्येत तपासण्यासाठी कोल्हापूरला येण्याची विनंती केली.

आबांनी मात्र, ‘मला घरी न्या!’ असा सारखा धोशाच लावला होता. त्यांची दवाखान्यात राहायची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना घराची ओढ लागली होती. आई घरीच असल्यामुळे जाण्यापूर्वी आईचा शेवटचा निरोप घ्यावा, असे त्यांना वाटत होते. माझ्या मनाची घालमेल होत होती. पण त्यांना घरी कसं घेऊन जायचं, हा यक्षप्रश्न माझ्यापुढे उभा होता! कारण घरामध्ये ऑक्सिजन किंवा इतर सुविधा नव्हत्या. शिवाय दवाखान्यात चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असतात. घरामध्ये ते शक्य नव्हतं. आबा मात्र हट्टालाच पेटले होते. आपल्याला मरण आपल्या घरीच यावं, असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी बरं होऊन घरी परत यावं, ही माझी इच्छा होती. वेडी आशा होती.

जणू हे आमच्या दोघांमधलं द्वंद्वच होतं!
आबांना पैलतीर दिसत होता!
मला तो दिसत नव्हता!
आबांना अखेरचा निरोप घ्यायचा होता!
मला त्यांना माघारी आणायचं होतं!
त्यांना वैकुंठ समोर दिसत होता!
मला जीवनाचं दर्शन होत होतं!
हा लढा जीवन-मृत्यूच्या मधला होता!
त्यात मी जीवनाच्या बाजूनं उभा होतो!
आबांना अनंताची ओढ लागली होती!
मला त्यांना तिथून जीवनाकडे खेचून आणायचं होतं!
हे अनादी अनंत असं द्वंद्व होतं!
या द्वंद्वाची ‘अंपायर’ नियती होती!
आणि मला हार पत्करायची नव्हती!

ठरल्याप्रमाणे डॉ. सोरटूर आबांना तपासायला आले. त्यांना पाहून आबा म्हणाले,
“माझ्याकडे कमी वेळ आहे. मला घरी सोडा.”
पण डॉक्टर काही बोलले नाहीत. अखेर निराश होऊन आबा उद्गारले, “शेवटी देवाची इच्छा. तुम्हाला जे काही तपासायचं असेल, ते आताच तपासा! नंतर मी बोलणार नाही! फक्त नामस्मरण करणार आहे!”
त्यांचं बोलणं ऐकून माझं मन चरकलं! पंढरपुरात घडलेल्या प्रसंगापासून मला जाणवलं होतं, की आबांना जरूर एखादी आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेली होती. आबांना पुढचं भविष्य कळत असावं काय?

त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं. मी त्यांना चमच्यानं पाणी पाजलं. परंतु, ते पाणी शेवटचंच ठरलं! त्यांनी डोळे मिटून घेतले. नामजपासाठी आबा कधी माळ वापरीत तर कधी कधी बोटांनीच जप करीत. आताही त्यांनी बोटे मोजतच जप सुरू केला. दहा मिनिटेच त्यांचा जप चालला असेल नसेल. तोच त्यांच्या बोटांची हालचाल हळूवारपणे थांबली! डॉक्टरांनी आबांना तपासलं!
“आता आबा या देहात राहिले नाहीत!” डॉक्टर उद्गारले.
आणि माझ्यावर आभाळ कोसळलं!
20 मे, 1987 रोजीची पहाट आमच्यासाठी काळरात्र ठरली!

आबा देहातून मुक्त झाले होते! आत्म्यानं देहाची कात टाकली होती! आबांचा चेहरा मात्र झोपी गेल्यासारखा शांत वाटत होता. ‘इदं न मम’ या सूत्रावर श्रद्धा ठेवून आबांनी अखेरचं महाप्रस्थान ठेवलं!

आबांच्या निधनानं माझ्या डोक्यावरचं छत्रच हरपलं. माझं हृदय अनंत आठवणींनी भरून आलं. आबांच्या अंगाखांद्यावर खेळतच माझं बालपण गेलं होतं. त्यांचं बोट धरून मी दुडूदुडू धावलो होतो. चिमुकल्या पावलांनी पुढे धावत जाऊन मला पकडण्याचं आव्हान मी त्यांना दिलं होतं. माझ्या बोबड्या बोलांना त्यांनीच आकार दिला होता. त्यांनीच मला आपल्या शेजारी बसवून आपल्या ताटातील घास माझ्या इवल्याशा चोचीत भरवला होता.

मला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांतून आबांचा देह अस्पष्ट दिसू लागला होता. माझ्या सर्व संवेदना बधिर झाल्या होत्या. आबा गेले! आता हा देह परत दिसणार नाही, हा विचार मनाला कुरतडत होता! दंश करीत होता! एक हुंदका खोल आतून वर उफाळून आला आणि कंठातच अडकून बसला! अतीव वेदनांनी गळ्याच्या शिरा ताठरल्या! डोळ्यांतून मात्र गंगा यमुना वाहू लागल्या! त्यांना मी रोखू शकलो नाही.

आबा पत्रकारितेतील एक अनभिषिक्त सम्राट होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कोल्हापूरसारख्या ठिकाणी ‘पुढारी’चा पाया भक्कम केला. केवळ त्यांच्यामुळेच ग्रामीण पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळाली. ‘पुढारी’नं लोकांना वाचायला शिकवलं, असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ‘पुढारी’नं जनमानसाच्या मनात अढळ विश्वास निर्माण केला. आबांचे अविश्रांत श्रम, त्यांची दूरद़ृष्टी आणि समतोल, संयमी लेखन या चतुःसूत्रीमुळेच ‘पुढारी’ प्रादेशिक वृत्तपत्र बनू शकलं.

त्यांच्या लेखणीला अवाजवी प्रशस्ती मंजूर नव्हती. तसेच अस्थानी व खोडसाळ टीका आणि निंदानालस्ती यापासूनही ते अलिप्त होते. एका अर्थानं संयमी, जबाबदार आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा मानदंड आबांनी निर्माण केला आणि हे करीत असतानाच त्यांनी काळाचं भानही अचूक ठेवलं. ‘जुने ते सोने’ ही प्रवृत्ती न बाळगता नवनिर्माणाचं, नवविचारांचं त्यांनी सतत स्वागतच केलं.

आबा हे पत्रकारितेतील एक विद्यापीठच होते. ते नेहमी नेमकं आणि मोजकंच बोलत असत. कुठेही अतिशयोक्ती होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेत. जे घडलं असेल, नेमकं तेच, पण काटेकोरपणानं आपल्या लेखणीतून उतरलं पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी संपादनातील तोल आणि समतोल कधी ढळू दिला नाही. सार्वजनिक जीवनातील विरोध कधी व्यक्तिगत पातळीवर आणायचा नाही, याचे पथ्य त्यांनी आयुष्यभर पाळलं. ते द्रष्टे होते, तसंच त्यांचं लिखाणही अभिरुचीसंपन्न होतं. अत्यंत संयमानं त्यांनी हेच धडे मलाही घालून दिले आणि ते माझ्या अंगी उतरवले. आबांचा खंबीर, अनुभवी, प्रेमळ आधार सतत माझ्या पाठीशी होता, म्हणूनच मी एवढी घोडदौड करू शकलो.

मात्र आज –
पत्रकारितेतील या सम्राटसिंहाच्या निष्प्राण देहाकडे बघताना माझं मन आतल्या आत आक्रंदत होतं! मला पोरकेपणाची जीवघेणी जाणीव करून देत होतं! माझ्यावर वज्राघातच झाला होता! सारं जग सुनं सुनं वाटू लागलं! माझ्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली!

आबा म्हणजे आभाळाची माया होती. तो आभाळाएवढा माझा आधार हरपला! माझ्या दुःखाला पारावर राहिला नाही. खरं तर सारा जाधव परिवारच शोकसागरात बुडून गेला. आईला झालेलं दुःख मी कोणत्या शब्दात सांगावं? आबांचे अगणित मित्र, सहकारी या सर्वांनाच धक्का बसला!
‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव या पत्रकारितेतील पर्वाची समाप्ती झाली.

ज्या घरातून आबा बोलत चालत दवाखान्यात गेले होते, त्याच घरात अखेर त्यांचं पार्थिव आणलं गेलं. नेहमी थट्टा-विनोद करणारे आबा आज कायमचे निःशब्द झालेले पाहून सर्वांचेच ऊर भरून आले. आईचा आक्रोश तरी गगनालाच जाऊन भिडला होता. तिथून आबांचं पार्थिव त्यांच्या लाडक्या ‘पुढारी’ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी नेऊन ठेवण्यात आलं. घरी आणि कार्यालयातही सुहृदांची अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली.

खासदार मधु दंडवते, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, ‘सत्यवादी’कार बाळासाहेब पाटील, महापौर पी. टी. पाटील, उद्योगपती मदनमोहन लोहिया, आमदार श्रीपतराव शिंदे, आमदार एन. डी. पाटील, आ. सदाशिवराव मंडलिक, उद्योगपती देवचंद शहा व रसिकभाई शहा, जिल्हाधिकारी ए. के. नंदकुमार आदी असंख्य मान्यवरांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. ‘पुढारी’ कार्यालयात तर लोकांची प्रचंड गर्दी झाली! जणू पंचगंगेला महापूरच आला होता.

आबांच्या निधनाबद्दल आकाशवाणीनं सकाळी सात वाजता, तर दूरदर्शननं सात वाजून वीस मिनिटांनी बातम्यांत सविस्तर वृत्त दिलं. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगाव, सांगली, रत्नागिरी आदी जिल्हे तसेच गोव्यातून आबांच्या चाहत्यांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली. आबांच्या पार्थिवावर राजकीय, व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक संस्था, तालीम व तरुण मंडळं, उद्योजक आदी क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी पुष्पचक्रे अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दुपारी सव्वातीनपर्यंत हजारो नागरिकांनी आबांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. राजकीय पुढार्‍यांच्या दोन-तीन पिढ्या घडवण्यात आबांचा सिंहाचा वाटा होता. त्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा लढा, गोवा मुक्ती संग्राम आदी राजकीय चळवळीमध्येही आबा अग्रभागी होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व इतर मंत्री शासकीय विमानानं कोल्हापूरला निघाले होते.

मात्र, त्या विमानात ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना कोल्हापूरला येता आलं नाही. त्यांनी लगेचच ‘पुढारी’मध्ये दूरध्वनी करून आपली असमर्थता व्यक्त केली. ‘आबांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शनही घेता न आल्याची खंत आयुष्यभर लागून राहील,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

अखेर मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बापूसाहेब प्रभूगावकर यांच्या वतीने जिल्हाधिकारी ए. के. नंदकुमार यांनी आबांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिलं.

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आबा चंदनाप्रमाणे झिजले. बेळगाव सीमाप्रश्न सुटावा म्हणून त्यांनी जीवाचं रान केलं. मग सीमाभागातून आबांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडोंच्या संख्येनं लोक न येतील तरच आश्चर्य!

अनेक मान्यवरांनी आबांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले, तर बेळगावचे महापौर नागेश सातेरी यांनी बेळगावच्या जनतेच्या वतीनं पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

दुपारी साडेतीन वाजता आबांच्या अंत्ययात्रेला ‘पुढारी’ कार्यालयापासून प्रारंभ झाला. आबा अखेर अंतिम प्रवासाला निघाले! आणि बहुजन समाज शोकसागरात बुडाला! पुष्पाच्छादित जीपवर त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. ‘पुढारी’ कार्यालयापासून सुरू झालेली आबांची अंतिम यात्रा महापालिका, महाराणा प्रताप चौकमार्गे, आईसाहेब महाराजांचा पुतळा ते बिंदू चौक आणि पुढे शिवाजी चौकमार्गे पापाची तिकटी, पंचगंगा तालीम आणि तिथून पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन पोहोचली.

वाटेत महापालिकेच्या वतीनं महापौर पी. टी. पाटील यांनी पुष्पहार वाहिला; तर जागोजागी सिंध क्लॉथ मर्चंटस् असोसिएशन, कोल्हापूर सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्स, रविवार पेठ को-ऑप. बँक, ऑटोरिक्षा युनियन, कम्युनिस्ट पक्ष, फळ व्यापारी संघटना, शिवसेना कार्यालय, विविध तालमी आणि मंडळांसह असंख्य संस्था, नेते व नागरिकांनी आबांच्या पार्थिवावर हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

आबांच्या निधनानं सार्‍या शहरावर शोककळा पसरली. शहरातील सर्व भागात बंद पाळण्यात आला. गंगावेश ते जामदार क्लब या भागात तर निःशब्द शांतता पसरलेली! शुक्रवार पेठेत आबांचं कित्येक वर्षे वास्तव्य होतं. त्यामुळे या भागावर दुःखाची गडद छाया पसरली होती. आबांच्या अंत्ययात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं आबालवृद्ध सामील झाले होते. आपल्या लाडक्या ‘पुढारी’कारांना अखेरचा निरोप देण्यासाठी, रस्त्याच्या दुतर्फा लोक प्रचंड गर्दी करून, साश्रू नयनांनी उभे होते!

पंचगंगा स्मशानभूमीवर अंत्ययात्रा पोहोचल्यावर अंत्ययात्रेचे रूपांतर शोकसभेत झालं. अस्ताला जाणार्‍या सूर्याच्या साक्षीनं अत्यंत शोकाकुल वातावरणात मी आबांच्या पार्थिवास मंत्राग्नी दिला! माझ्या आयुष्यातील एक सुवर्णपान पंचत्वात विलीन झालं. माझ्या पाठीवरचा हक्काचा, मायेचा हात काळाच्या उदरात गडप झाला.

अग्रलेखाचा शब्दप्रभु अनंतात विलीन झाला होता! संपादकाची खुर्ची उदासवाणी झाली होती! लेखणी पोरकी झाली होती! चष्मा नेत्रहीन झाला होता! टेबलावरची कोर्‍या कागदांची चळत सैरभैर झाली होती!

म्हणून त्या दिवशीच्या अंकातील अग्रलेखाचा कॉलम कोराच ठेवण्यात आला! तो सुना सुना वाटत होता! परंतु, त्या भोवतीची काळी चौकट मात्र बोलकी होती! ती चौकट म्हणजे जणू दुःखाचं, वियोगाचं, आक्रंदनाचं प्रतीकच होतं!

दुसर्‍या दिवसानंतर मात्र मी सारं दुःख गिळून टाकलं. मला सावरणं भागच होतं. राजा गेला तरी राज्य पुढं चालवावंच लागतं. आबांनी माझ्या खांद्यावर दिलेली पालखी मला पुढे वाहून नेणं भागच होतं. ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे मी लेखणी हाती घेतली आणि अग्रलेख लिहायला बसलो –
‘छत्र हरपले!’
या अग्रलेखात मी माझ्या भावभावनांना वाट मोकळी करून दिली. कदाचित स्वतःच्या पित्याच्या मृत्यूवर, पुत्रानं लिहिलेला पत्रकारितेचा इतिहासातील पहिलाच अग्रलेख असावा!….

Back to top button