पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील मलप्पूरमध्ये शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी पलेस्टाईन समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. याचे आयोजन जमात-ए-इस्लामीच्या युवा शाखा सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटने केले होते. आता ही रॅली मोठ्या वादाच्या भोवर्यात सापडली आहे. दहशतवादी संघटना हमासचा म्होरक्या खालेद मशाल 'व्हिडीओ कॉन्फरन्स'च्या माध्यमातून या रॅलीत सहभागी झाला होता. यामुळे ही रॅली वादाच्या भाेवर्यात सापडली आहे. ( Kerala Jamaat Islami Rally )
केरळमध्ये पलेस्टाईन समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत 'व्हिडीओ कॉन्फरन्स'च्या माध्यमातून सहभागी झालेला खालेद मशाल हा दहशतवादी संघटना हमासच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. हमासची सूत्रे २०१७पर्यंत त्याच्या हाती होती. मशाल हा अनेक वर्षांपासून हमासच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जाताे. 'बीबीसी' रिपोर्टनुसार, मशालचा याचा जन्म पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागात झाला. मात्र त्याचे वास्तव्य जॉर्डन आणि कुवेतमध्ये राहिले आहे. पॅलेस्टाईनच्या बाहेर वास्तव्यास असूनही खालेद मशाल याला २००४ मध्ये हमासचे राजकीय प्रमुख बनवण्यात आले. तो कधीच स्वतः गाझा शहरामध्ये राहिलेला नाही. तो जॉर्डन, सीरिया, कतार आणि इजिप्तमधून वास्तव्य करुन हमासची सर्व सूत्रांचे नियंत्रण करत असे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, खालेद मशाल सध्या कतारमध्ये राहत असून, त्यांची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलर आहे.
केरळच्या रॅलीत 'व्हिडीओ कॉन्फरन्स'च्या माध्यमातून खालेद मशाल सहभागी झाल्याने केरळमध्ये नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या रॅलीत हिंदुत्वाविरोधातील फलक झळकत होते. यावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले की, पॅलेस्टाईन वाचवण्याच्या नावाखाली दहशतवादी संघटनेचा गौरव केला जात आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे.हमास नेत्याने रॅलीला संबोधित केले तेव्हा केरळ पोलीस कुठे होते? हमासच्या नेत्यांचे योद्धे म्हणून वर्णन केले जात आहे, हे अजिबात मान्य करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केरळ भाजपचे उपाध्यक्ष व्हीटी रेमा म्हणाले की, 'हे अत्यंत धक्कादायक आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात इस्लामिक दहशतवादी संघटनेने आपला खरा चेहरा दाखवला आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केला हे सर्वांनाच माहीत आहे.
रॅलीचे आयोजन करणाऱ्या संघटनेचे राज्य अध्यक्ष सुहैब सीटी याने सांगितले की, 'हमास नेत्याने रॅलीला संबोधित करणे हा गुन्हा नाही आणि हमास भारतातून कामही करत नाही. पॅलेस्टाईनच्या लोकांच्या समर्थनार्थ आम्ही रॅली काढली हाेती. त्यात हमासचे नेते सहभागी झाले. यात काही असामान्य नाही. हमास नेत्यांनी यापूर्वी केरळमधील लोकांना संबोधित केले आहे. दरम्यान, इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलान यांनीही केरळमधील रॅलीतील हमास नेत्याच्या भाषणावर आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे.
हेही वाचा :