Israel-Hamas war updates | इस्रायलचे गाझातील १५० भूमिगत ठिकाणांवर हल्ले, हमासचे अनेक दहशतवादी ठार | पुढारी

Israel-Hamas war updates | इस्रायलचे गाझातील १५० भूमिगत ठिकाणांवर हल्ले, हमासचे अनेक दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन : इस्रायलने गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या युद्धविमानांनी रात्रभर १५० भूमिगत ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात हमासच्या एरियल ऑपेरशन्सचा प्रमुख ठार झाला आहे. इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) म्हटले आहे की त्यांनी गाझा पट्टीच्या उत्तरेकडील बोगदे ज्यात दहशतवादी अड्डे आहेत आणि भूमिगत लढाऊ ठिकाणांवर हल्ला केला. यात हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या कारवाई दरम्यान मारला गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हमासच्या एरियल ऑपेरशन्स प्रमुखाचा समावेश होता. असम अबू रकाबा असे त्याचे नाव आहे. (Israel-Hamas war updates)

संबंधित बातम्या 

इस्रायली संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार, गाझा सीमेजवळील इस्रायली समुदायांवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यामागे असम अबू रकाबाचा हात होता. त्याने पॅराग्लायडर्सना इस्रायलमध्ये घुसखोरी करण्याचे निर्देश दिले होते. ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील १,४०० हून अधिक लोक मारले गेले होते. तर सुमारे २०० लोकांना नेऊन गाझामध्ये ओलिस ठेवले होते.

दरम्यान, इस्रायलने गाझावर रात्रभर हल्ले केले. यामुळे शनिवारी सकाळी सगळीकडे धुराचे लोट दिसून आले. गाझा सीमेजवळील ॲश्केलॉन शहरात लढाऊ विमानांनी जोरदार बॉम्ब वर्षाव केला. हे शहर बॉम्ब हल्ले आणि गोळीबाराने रात्रभर हादरून गेले. इस्रायल- हमास युद्धादरम्यानची ही सर्वात व्यस्त रात्र होती.

इस्रायली संरक्षण दलाने शुक्रवारी सांगितले की ते गाझा पट्ट्यात जमिनीवरील कारवाई तीव्र करत आहोत. दरम्यान, गाझाचा जगाशी संपर्क तुटला आहे. येथील एका मोठ्या टेलिकॉम कंपनीने मोबाइल फोन सेवा पूर्णपणे बंद असल्याचे म्हटले आहे. गाझामधील इंटरनेटसेवाही बंद झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने म्हटले आहे की त्यांचा गाझामधील त्यांच्या स्थानिक कर्मचार्‍यांशी संपर्क तुटला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी X वर पोस्ट करत सांगितले की आरोग्य संघटनेचा त्यांच्या कर्मचार्‍यांशी तसेच आरोग्य सुविधा, आरोग्य कर्मचारी आणि जमिनीवर मानवतावादी मदत करणाऱ्या लोकांशी संपर्क तुटला आहे. (Israel-Hamas war updates)

हे ही वाचा :

Back to top button