Delhi Air Pollution : दिल्लीचा श्वास कोंडला! ल्युटियन्स झोन प्रदूषित | पुढारी

Delhi Air Pollution : दिल्लीचा श्वास कोंडला! ल्युटियन्स झोन प्रदूषित

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :

(Delhi Air Pollution) राजधानी दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक ४०० हून अधिक नोंदवण्यात आल्याने घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दिल्ली सरकारकडून सातत्याने या सूचना दिल्या जात आहेत. परंतु, दिल्लीतील एकही ठिकाणची वायु गुणवत्ता हवामान सामान्य श्रेणीत नाही. शुक्रवारी दुपारी राजपथ, इंडिया गेट, संसद भवन परिसरासह ल्युटियन्य झोन परिसरातील वायु गुणवत्ता निर्देशांक ५०० पर्यंत नोंदवण्यात आला. (Delhi Air Pollution)

गेले काही दिवसांपासून दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अत्यंत वाईट स्थितीत नोंदवला जात आहे. अशात दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी डोळ्यांसाठी त्रासदायक अशा धुरक्यांचा सामना नागरिकांना करावा लागला. अनेक भागातील दृष्यमानता जवळपास २०० मीटरने कमी झाली होती.

दिवाळीनंतर गेल्या सात दिवसांपैकी पाच दिवसात दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब अशा श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या (डीपीसीसी) अहवालानुसार, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नागरिक दरवर्षी १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान सर्वात वाईट अशा हवेत श्वास घेतात.

शहरात सकाळी ९ वाजता एक्यूआय ४५४ नोंदवण्यात आला. गुरूवारी सरासरी एक्यूआय ४११ होता. फरिदाबाद ४५२, गाझियाबाद ४९०, ग्रेटर नोएडा ४७६, गुरूग्राम ४१८ आणि नोएडात सकाळी ९ वाजता एक्यूआय ४३४ नोंदवण्यात आला.

० ते ५० मधील एक्यूआय चांगल्या,५१ ते १०० एक्यूआय समाधानकार, १०१ ते २०० मध्यम आणि ३०० एक्यूआय खराब श्रेणीत मोजले जाते. ३०१ ते ४०० एक्यूआय अत्यंत खराब आणि ४०१ ते ५०० एक्यूआय गंभीर श्रेणीत मानले जाते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार (सीपीसीबी) दिल्ली-एनसीआरमध्ये फुफ्फुसांना नुकसान करणाऱ्या सूक्ष्म कणांचे (पीएम २.५) २४ तासांचे सरासरी प्रमाण सकाळी ९ वाजता ३४६ मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर इतके होते. जे सुरक्षिततेपेक्षा सहापटीने जास्त होते. तर, पीएम १० ची पातळी ५४४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवण्यात आली.

अशात ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पातील बांधकामामुळे ल्युटेन्स झोन परिसरात प्रदूषणाने कळस गाठला आहे. दिल्लीकर नागरिकांचा त्यामुळे श्वास कोंडला जात असल्याचे दिसून आले आहे.

संसद भवन, इंडिया गेटचा काही भाग आणि राजपथच्या दुतर्फा पत्र्यांचे कडे उभारुन सेंट्रल विस्टा चे बांधकाम सुरू आहे.पंरतु, बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास होवू लागले आहेत.

ल्युटियन्स झोन मध्ये देशातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तींचा निवास असतो. पंतप्रधान आणि बहुतांश मंत्र्यांचे कार्यालय याच परिसरात आहेत. सेंट्रल विस्टामध्ये नवीन संसद भवनाचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत राजपथच्या दोन्ही बाजुंनी नवीन बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करायचा असला तरी ऑक्टोबर ते फेबु्रवारपर्यंत दिल्ली, एनसीआरमध्ये हवेतील प्रदूषण हे सातत्याने ‘रेड अलर्ट’मध्ये असते.

केजरीवाल सरकारने बंदी आणली असतानाही दिवाळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे हवेतील गुणवत्ता निर्देशांक हजारावर गेले. त्या दिवशीपासून दिल्लीकरांना ‘अत्यंत हानिकारक’ हवामानाचा सामना करावा लागतो आहे.

कनॉट प्लेस हे दिल्लीतील महत्वाचे ठिकाण आहे. इथे लोकांना प्रदुषणाचा सामना करावा लागतो. हा भाग प्रदूषण मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमेरिकेहून आयात केलेले स्मॉग टॉवर बसविले आहे.

हा टॉवर एक किलोमीटरच्या परिघात हवा स्वच्छ करेल. याची खात्री केजरीवालांना असली तरी या परिसरातही वायू गुणवत्ता निर्देशांक रेड झोन दर्शवत आहे. अशात सर्वसामान्यांच्या आरोग्याला वाढत्या प्रदूषणाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button