Hamoon Cyclone: ‘हॅमून’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार! ‘या’ ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

Hamoon Cyclone: 'हॅमून' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार! 'या' ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: वायव्य बंगालच्या उपसागरात ‘हॅमून’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची अधिक शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले. हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तसेच बुधवारी (२५ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास बांगलादेशात खेपुपारा आणि चितगाव दरम्यान धडकण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने ‘एक्स’वरून (पूर्वीचे ट्विटर) सांगितले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Hamoon Cyclone)

वायव्य बंगालच्या उपसागरात ‘हॅमून’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव देशातील अनेक राज्यांवर पडण्याची अधिक शक्यता आहे. चक्रीवादळामुळे सात राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, आसाम आणि मेघालय या राज्यांत पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना २५ ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. (Hamoon Cyclone)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘हॅमून’ चक्रीवादळ आज सकाळी ६ च्या सुमारास तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. “चक्रीवादळ वादळ ‘हॅमून’ वायव्य बंगालच्या उपसागरात आणखी तीव्र होण्याची अधिक शक्यता आहे. आज पहाटे ३ च्या सुमारास ‘हॅमून’ चक्रीवादळ१८ किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे सरकत राहिले. ते सध्या पश्चिम बंगालच्या वायव्य, पश्चिममध्य उपसागरापर्यंत आले आहे. या चक्रीवादळाचे सध्याचे स्थान ओडिशातील पारादीपपासून सुमारे 200 किमी आग्नेय आणि दिघाच्या 290 किमी दक्षिण-पूर्वेस आहे असे देखील हवामान विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Hamoon Cyclone)

Hamoon Cyclone: ‘या’ राज्यात पावसाचा इशारा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर IMD ने आज (दि.२४) आणि उद्या (दि.२५) मणिपूर, मिझोराम, दक्षिण आसाम आणि मेघालय आणि आज ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय, हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्वमध्य, पश्चिम मध्य, उत्तर आणि ओडिशा, पश्चिम बंगाल बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनार्‍याजवळून दूर जाण्यास सांगण्यात आले आहे.

‘तेज’ चक्रीवादळाने येमेनचा किनारा ओलांडला

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तेज’ चक्रीवादळाचे रविवारी (दि.२२) अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. IMD च्या ताज्या अपडेटनुसार, ‘तेज’ ने येमेनचा किनारा ओलांडला आहे. येमेनच्या किनारपट्टीवर हे तीव्र चक्रीवादळ कमकुवत झाले आहे. “पुढील ६ तासांत ते आणखी उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची आणि आणखी कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे,” असे देखील IMD ने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button