Tej Cyclone : ‘तेज’चे आज महाचक्रीवादळात रूपांतर | पुढारी

Tej Cyclone : ‘तेज’चे आज महाचक्रीवादळात रूपांतर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रातील दक्षिण पश्चिम भागात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर शनिवारी ‘तेज’ चक्रीवादळात झाले. रविवारी सायंकाळी त्याचा वेग वाढून त्याचे महाचक्रीवादळात रूपांतर होणार आहे. मात्र, याचा राज्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

या चक्रीवादळाचा वेग ताशी 130 किलोमीटर असून, ते सध्या येमेनपासून 620, तर ओमानपासून 980 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. गेल्या पाच दिवसांपासून या चक्रीवादळाची निर्मिती अरबी समुद्रात सुरू होती. आता ते उत्तर पश्चिम दिशेकडे 22 ऑक्टोबर रोजी सरकणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. त्यानंतर ते येमेन आणि ओमानच्या दिशेने सरकणार आहे.

राज्यात फारसा परिणाम नाही

या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम नाही. मात्र, केरळ ते तामिळनाडू या भागात दोन दिवस मुसळधार पाऊस होणार आहे; तर 25 व 26 रोजी अरबी समुद्रात खवळलेले वातावरण असल्यामुळे मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम या राज्यांत मोठा पाऊस पडणार आहे.

गुजरात किनारपट्टीवर परिणाम नाही

चक्रीवादळाचा गुजरातवर कोणताही परिणाम होणार नाही. तेथील हवामान पुढील सात दिवस कोरडे राहील.

‘तेज’ नाव दिले भारताने…

या चक्रीवादळाला ‘तेज’ हे नाव भारताने दिले आहे. नैऋत्य अरबी समुद्रात त्याची अतिशय खवळलेली स्थिती असून, 21 ते 23 ऑक्टोबर अशी ती स्थिती राहणार आहे. 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगला देश किनारपट्टीवर समुद्राचीही स्थिती खवळलेली राहणार आहे.

हेही वाचा

बाळासाहेब थोरात, खर्गे, वेणुगोपाल यांची भेट; लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा

कोल्हापूर : शस्त्राच्या धाकाने दहशत; पोलिस दाम्पत्य निलंबित

राज्‍यरंग : शिवाजी पार्क राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार

Back to top button