लखीमपूर खीरी प्रकरणाची सुनावणी सोमवारी यूपी सरकार सादर करणार प्रतिज्ञापत्र | पुढारी

लखीमपूर खीरी प्रकरणाची सुनावणी सोमवारी यूपी सरकार सादर करणार प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीपूर खीरीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणाची सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली. आता, सोमवारी १५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. याप्रकरणी राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

आजची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे यांच्याकडून खंडपीठासमक्ष करण्यात आली. राज्य सरकारची विनंती मान्य करीत सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती सूर्यकांत तसेच न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सुनावणी दोन दिवस पुढे ढकलली.

३ ऑक्टोबरला लखीमपूर खीरीत झालेल्या हिंसाचाराचा योग्यरित्या तपास करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

गेल्या सुनावणीत खंडपीठाने विशेष तपास पथकाच्या तपासावर असंतोष व्यक्त करीत, या प्रकरणाचा तपास राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत का करण्यात येवू नये? अशी विचारणा राज्य सरकारला केली होती. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करण्यासंबंधी खंडपीठाने मत नोंदवले होते.सोमवारी राज्य सरकारकडून प्रकरणाच्या तपास प्रक्रियेसंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलना दरम्यान लखीमपूर खीरीत केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्र उर्फ टेनी यांचा मुलगा आशीष मिश्र यांच्या वाहनांच्या ताफ्याने चिरडल्याने चार शेतकऱ्यांसह इतर आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशीष यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानूसार आशीष यांच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button