Aam Aadmi Party : पाच राज्यात आम आदमी पक्ष वाढवणार काँग्रेसची डोकेदुखी | पुढारी

Aam Aadmi Party : पाच राज्यात आम आदमी पक्ष वाढवणार काँग्रेसची डोकेदुखी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप आणि अन्य पक्षांसह आम आदमी पक्षानेही उडी घेतली आहे. आम आदमी पक्षाकडून यापूर्वीच छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आता मिझोराम राज्यातील काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच आम आदमी पक्षाकडून छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी ३७ तर मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी ३० स्टार प्रचारक जाहिर करण्यात आले आहेत. यात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्यक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे नेते डॉ. संदीप पाठक, खासदार संजय सिंग, राघव चढ्ढा, दिल्लीच्या मंत्री अतिशी मारलेना यांचा समावेश आहे. (Aam Aadmi Party)

Aam Aadmi Party : ‘या’ भूमिकेचा फटका बसण्याची चिन्ह

आम आदमी पक्ष हा विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम या राज्यांमध्ये निवडणूक लढणार आहे. याचा फटका इंडिया आघाडीतील घटक पक्षांना बसण्याची शक्यता आहे. मुख्यतः काँग्रेस पक्षाला आम आदमी पक्षाच्या या भूमिकेचा फटका बसण्याची चिन्ह आहेत.

आम आदमी पक्षाच्या वतीने आतापर्यंत छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ३३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मिझोरममध्ये ४ उमेदवारांची घोषणा केली आहे आणि मध्यप्रदेशमध्येही ३९ उमेदवारांची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये तर सर्वच्या सर्व म्हणजे ९० जागा लढण्याचा आम आदमी पक्षाचा मानस आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची ही भूमिका काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

 

Back to top button