पुढारी ऑनलाईन डेस्क : रेल्वे स्थानकावर वेळेवर न पोहोचल्याने प्रवाशांच्या अनेकदा गाड्या चुकतात. काही वेळा प्रवासी घाईघाईत चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकावर घडला. वंदे भारत ट्रेनमध्ये (Vande Bharat Express) धावत जाऊन चढताना खाली पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर होत आहे.
संबंधित बातम्या :
मंगळवारी (दि.११) एक प्रवासी वंदे भारत (Vande Bharat Express) ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटली होती. त्याचवेळी तो प्रवासी धावत जाऊन ट्रेनमध्ये चढू लागला. चढताना त्याचा पाय घसरला, रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये तो लटकत होता. त्यावेळी तेथे ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने धावत जाऊन त्याला बाहेर काढले. आणखी काही सेकंद उशीर झाला असता तर कदाचित प्रवाशाच्या जीवावर बेतले असते.
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे प्रवाशाचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या केबिनमध्ये पडणार होता. त्यानंतर प्रवाशाने आरपीएफ जवानाचे आभार मानले.
दरम्यान, ही घटना नवीन नाही, याआधी जूनमध्ये तेलंगणातील बेगमपेट रेल्वे स्थानकावर एका महिलेचा पाय घसरला होता. ती रुळावर पडणार होती पण एका हवालदाराच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला होता. मार्च महिन्यात वांद्रे टर्मिनस येथे एका व्यक्तीने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा तोल गेल्याने तो फलाटावरून फरफटत होता. मात्र, तेथे कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्यांचे प्राण वाचवले. रेल्वे मंत्रालय प्रवाशांना अशा चुका करू नये, अशा सूचना नेहमी देत असते.
हेही वाचा :