पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या संसद भवनाचा आज (दि.१९ सप्टेंबर) शुभारंभ होत आहे. आपण या नव्या संसद भवनातून नव्या प्रवासाला सुरूवात करत आहोत. भारत अनेक सिद्धींसह नवीन संकल्प आणि प्रेरणेने नवीन संसद भवनात प्रवेश करत आहे, असे पीएम मोदींनी म्हटले आहे. नवीन सभागृहातील पहिल्या दिवशी आणि विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पीएम मोदी संसद सभागृहाला संबोधित करत होते. (new parliament building)
आधुनिक भारत आणि आपल्या लोकशाहीचे प्रतीक असलेल्या नवीन संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. आज गणेश चतुर्थीचा शुभ दिवस असून हा सुखद संयोग आहे. नवीन संसद भवनाचे हे पहिले आणि ऐतिहासिक अधिवेशन आहे. त्यासाठी मी सर्व सन्माननीय खासदार आणि देशवासियांना शुभेच्छा देतो. पीएम नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सर्वांचे स्वागत केले आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या. (new parliament building)
गणेश चतुर्थी म्हटले की, लोकमान्य टिळकांची आठवण येते. टिळकांनी दिलेल्या प्रेरणेसह पुढे जाऊयात, असे म्हणत गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री गणेश ही संकल्प आणि सिद्धीची देवता आहेत, असेही पीएम मोदी यांनी स्पष्ट केले. (new parliament building)
भूतकाळातील अनेक कटू आठवणींना विसरून आपण पुढे जाऊया. जे काही करू ते देशासाठी प्रेरणादायी ठरेल. नवीन संसदभवन अधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. जेव्हा संसदीय लोकशाहीच्या या नवीन सदनाचे उद्घाटन होत आहे. तेव्हा इथे स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणाचा साक्षीदार आहे, तो म्हणजे 'पवित्र सेंगोल'. या सेंगोंलला माजी पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हाताचा स्पर्श झाला आहे. हे सेंगोंल आम्हाला महत्त्वाच्या भूतकाळाशी जोडते. येणाऱ्या पिढीला नवीन संसदेतील हा सेंगोल प्रेरणादायी ठरेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.