पुढारी ऑनलाईन डेस्क: जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉल अनेक भावनांनी भरलेला आहे. हा प्रसंग आपल्याला भावनिकही बनवतो आणि पुढे जाण्याची प्रेरणादेखील देताे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद इमारतीच्या निरोप समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. (parliament special session 2023 live)
आज (दि. १९) जुन्या संसद भवन इमारतीचा निरोप सभारंभ होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १७ व्या लोकसभेचे सर्व खासदार जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्रित जमले आहेत. तत्पूर्वी, जुन्या संसद भवनासमोर सर्व खासदारांचे एकत्रित फोटोसेशन झाले. यानंतर अनेक खासदारांनी संसदेच्या आठवणींना उजाळा दिला. (parliament special session 2023 live)
याप्रसंगी सभागृहाला संबोधित करतानी पीएम मोदी म्हणाले, याच सेंट्रल हॉलमध्ये 1947 रोजी ब्रिटिश सरकारने आपल्याला सत्ता हस्तांतरित केली. हा सेंट्रल हॉलही (मध्यवर्ती सभागृह) त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता. या दिवशी आपले राष्ट्रगीत आणि तिरंगा स्वीकारण्यात आला. 1952 नंतर, जगातील सुमारे 41 राष्ट्रप्रमुखांनी सेंट्रल हॉलमध्ये येऊन आपल्या आदरणीय खासदारांना संबोधित केले. तसेच राष्ट्रपतींनी 86 वेळा याच हॉलमधून खासदारांना संबोधित केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. (parliament special session 2023 live)
आपण सर्वजण भाग्यवान आहोत की, आपल्याला याच सभागृहात कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळवण्याची संधी मिळाली. अशा अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये संसदेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'तिहेरी तलाक', 'ट्रान्सजेंडर', कलम 370 चे ऐतिहासिक रद्दीकरण हे कायदे म्हणजे या संसद सभागृहाचे सर्वोच्च यश आहे. आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मिळून ४ हजारांहून अधिक कायदे केले आहेत, असेही पंतप्रधान माेदी यांनी नमूद केले.
देश ज्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याचे अपेक्षित परिणाम लवकरच मिळतील, असा मला विश्वास आहे. आज भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण संसदेच्या नवीन इमारतीत नवीन भविष्याची सुरुवात करणार आहोत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या निर्धाराने आम्ही नवीन इमारतीत जात आहोत, असेही पंतप्रधान माेदी यावेळी म्हणाले.
आज जग भारताच्या आत्मनिर्भर मॉडेलबद्दल बोलत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे उद्दिष्ट आपल्याला सर्वात पहिले पूर्ण करायचे आहे. मी लाल किल्ल्यावरून 'यही समय है, सही समय है' म्हटलं होतं. त्यानंतरच्या घडामोडींवर नजर टाकल्यास, हे लक्षात येते की भारत नवीन जागरूकता आणि उर्जेने जागा झाला आहे. हे लाखो लोकांच्या स्वप्नांना संकल्प आणि वास्तवात बदलू शकते, असेही पीएम मोदी यांनी जुन्या संसद सभागृहातील सेंट्रल हॉलमधून खासदारांना संबोधित करताना म्हटले आहे.