Parliament Special Session | संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप; सर्व खासदार एकत्रित; फोटोसेशनसह अनेक आठवणींना उजाळा | पुढारी

Parliament Special Session | संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप; सर्व खासदार एकत्रित; फोटोसेशनसह अनेक आठवणींना उजाळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जुन्या संसद भवन इमारतीचा निरोप सभारंभ होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १७ व्या लोकसभेचे सर्व खासदार जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्रित जमले आहेत. तत्पूर्वी, जुन्या संसद भवनासमोर सर्व खासदारांचे एकत्रित फोटोसेशन झाले. यानंतर अनेक खासदारांनी संसदेच्या आठवणींना उजाळा दिला.

तर दुसऱ्या बाजूला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदीय कामकाज नव्या संसद भवनात स्थलांतरित होणार आहे. त्यासाठीची संसद भवन परिसरात जय्यत तयारी देखील सुरू आहे. नव्या इमारतीत स्थलांतर होण्यापूर्वी सर्व खासदारांना राज्यघटनेची प्रत देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी राज्यघटनेची प्रत सोबत घेऊन नव्या संसद भवनात प्रवेश करतील, अशीही माहिती खासदारांनी दिली आहे.

एक खासदार म्हणून मी माझ्या प्रयत्नातून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, मग तो पर्यावरण मंत्री म्हणून असो किंवा भाजपचा खासदार म्हणून असो. सहानुभूती आणि दयाळूपणापेक्षा जगात कोणतीही शक्ती नाही, कारण ते कमी भाग्यवान व्यक्तीचे जीवन बदलू शकतात, असे मत लोकसभा खासदार मनेका गांधी सेंट्रल हॉलमध्ये संबोधित करताना व्यक्त केले.

स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची रूपरेषा तयार करण्यासाठी 389 दिग्गजांनी सेंट्रल हॉलमध्ये 2 वर्षे 11 महिने विविध पैलूंवर चर्चा केली. देशात अनेक क्षेत्रात आव्हाने आहेत, आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास 2047 पूर्वीच देशाला विकसित राष्ट्र बनवू शकतो, असे मत काँग्रेसचे खासदार अधिर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले.

Back to top button