Nagar City Hospital Fire : मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत: हसन मुश्रीफ | पुढारी

Nagar City Hospital Fire : मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत: हसन मुश्रीफ

पुढारी ऑनलाईन डेस्क

नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्‍या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. (Nagar City Hospital Fire) जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चौकशीनंतर दुर्घटनेमागील वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटनेची चाैकशी करण्‍यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून,रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सत्य बाहेर काढणार येईल. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल, असेही ते म्‍हणाले.

Nagar City Hospital Fire : फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल

रुग्‍णालयास लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात मी स्वत: रुग्णालयाला  चारवेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे. फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सर्वोतोपरी मदत करणार

या घटनेचा लवकरात लवकर चौकशी करण्यात येणार असून संबधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आगीतील, जखमींवर योग्य उपचार करण्यात येतील आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक दीपक पांडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११ झाला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. ते सर्व कोरोनाबाधित होते. शॉर्टसर्किटमुळे आयसीयूत आग लागली.

हेही वाचलं का?

 

Back to top button