नव्या संसद भवनावर उद्या ध्वजारोहण | पुढारी

नव्या संसद भवनावर उद्या ध्वजारोहण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून (१८ सप्टेंबर) सुरू होणार आहे. त्यासाठी उद्या (१७ सप्टेंबर) सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी, उद्या सकाळी नव्या संसद भवनाच्या प्रमुख गज द्वारावर औपचारिक ध्वजारोहण होणार आहे. उपराष्ट्रपती व राज्यसभा राज्यसभा सभापती जगदीप धनकड आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात येईल. तर उद्या आपला वाढदिवस साजरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावेळी उपस्थित राहतील.

विशेष अधिवेशनाआधी नव्या संसद भवनाच्या इमारतीवर विश्वकर्मा पुजेच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होणार आहे. या इमारतीच्या तीन प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या गज द्वारासमोर ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. यानंतर गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात संसदीय कामकाजाला सुरवात होणार आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होत आहे. अधिवेशनाचा प्रारंभ जुन्या संसद भवनात होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबरला मध्यवर्ती कक्षामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत जुन्या संसद भवनाला निरोप देण्याचा औपचारिक कार्यक्रम होईल. त्यानंतर, शोभायात्रेने नव्या संसद भवनात स्थलांतर होईल.

दरम्यान, संसदेतील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विशेष अधिवेशनासाठी सर्वपक्षीय बैठक होईल. पाच दिवसांच्या अधिवेशन कालावधीमध्ये अमृत काळाची चर्चा आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या वेतन व नियुक्तीसंदर्भातील विधेयकासह अन्य चार विधेयके मंजूर करण्याचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जी-२० परिषदेचे आयोजन, चंद्रयान -३ मोहिम यावर सरकारचे अभिनंदन करणारा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नव्या संसदेत नवा गणवेश

नव्या संसद भवनासाठी सारे काही नवे राहणार असून लोकसभा सचिवालयाच्या आदेशानुसार, मार्शल, सुरक्षा कर्मचारी, अधिकारी, चेंबर अटेंडंट आणि वाहनचालक यांना नवीन गणवेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना बंदगळा सूट ऐवजी किरमिजी किंवा गडद गुलाबी नेहरू जॅकेट परिधान करावे लागेल. तर कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये खाकी रंगांची विजार आहे. दोन्ही सभागृहांमधील मार्शलच्या गणवेशामध्ये मणिपुरी पगडीचा समावेश करण्यात आला आहे.

.हेही वाचा 

सांगली : खासगीकरणाच्या धोरणावरुन सुभाष पाटील यांची राज्य सरकारवर टीका

‘आनंदाचा शिधा’ घेण्यासाठी त्यांना करावी लागते 10 किलोमीटरची पायपीट

घरा-घरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करा : अविश्यांत पंडा

Back to top button