घरा-घरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करा : अविश्यांत पंडा | पुढारी

घरा-घरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करा : अविश्यांत पंडा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच मातृभूमीसाठी झटणारे व त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मानार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व निमशासकीय, शासकीय यंत्रणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कलश यात्रेतून घरा-घरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले.

अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून घरोघरी देशभक्तीचा जागर व्हावा , यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणेसोबत आढावा बैठक घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त देवीदास पवार तसेच दूरदृष्य प्रणालीव्दारे उपविभागीय अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.

प्र.जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदुळ कलशांमध्ये दि. ३० सप्टेंबरपर्यंत गोळा करावे. सोबतच पंचप्रण शपथही द्यावी. माती संकलन करताना उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल , यासाठी ढोलताशे, देशभक्तीपर गीत व इतर उपक्रमांच्या माध्यमातून वाजतगाजत माती संकलित करावी. या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या अधिनस्त सर्व शाळांना सहभागी करुन घ्यावे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली, कलापथक, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविधांगी उपक्रमातून अमृत कलश यात्रेची स्थानिक स्तरावर जनजागृती करावी. शासकीय यंत्रणानी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ही चळवळ यशस्वी करावी, असे ही ते यावेळी म्हणाले.

माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकप्रतिनिधी, नागरिकांनी माती संकलन करुन अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी केले आहे.

अमृत कलश यात्रेविषयी

पहिला टप्प्यात दि. १ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येईल. यावेळी पंचप्रण शपथही घेतली जाईल. वाजतगाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे. दि.१ ते १३ ऑक्टोबरपर्यंत तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. यावेळी जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा यावेळी गौरव करण्यात येईल.

दि. २२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. दि. २७ ऑक्टोबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

दि. २८ ते ३० ऑक्टोबरपर्यंत देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या “अमृत वाटिके”त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल.

-हेही वाचा 

Jalebi Fish : जिलेबी माशामुळे पूर्णा नदीची जैवविविधता धोक्यात

Shoaib Akhtar on Team India | ‘पाकिस्तान को सुकून होगा!’ शोएब अख्तरची टीम इंडियावर टीका

Nashik Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

 

Back to top button