चंद्रयान-3 यशस्वी होताच इस्त्रोची डिमांड वाढली; जगभरातून इस्त्रोला मेल | पुढारी

चंद्रयान-3 यशस्वी होताच इस्त्रोची डिमांड वाढली; जगभरातून इस्त्रोला मेल

आशिष देशमुख

पुणे : चंद्रयान -3 हे मिशन यशस्वी होताच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोची डिमांड जगभर वाढली आहे. जगभरातील कंपन्यांनी इस्त्रोकडे मेल करून विविध प्रकारच्या कामांची मागणी व टेंडरसाठी विनंतीपत्रे येत आहेत. आजवर इस्त्रोची वेबसाईट कुणी फारसे उघडून पहात नव्हते; पण आता जगभरातील विद्यार्थांनी सुरू केलेल्या स्टार्टअपचे लक्ष आता इस्त्रोकडे असून त्यांनीही विविध प्रकारच्या कामांच्या निविदा भरल्या आहेत. यात आगामी काळातील नव्या मिशनसाठी अमेरिका, युरोप खंडातून सर्वाधिक चौकशी होत आहे.

देशी अन् विदेशी कंपन्यांचे स्वागत…

इस्त्रो ही संस्था आता नासाच्या पंगतीत जाऊन बसली असून, विदेशातून येणार्‍या चौकशीचे स्वागत या संकेतस्थळावर केले जात आहे. देशाच्या विविध भागांतून मोठ-मोठ्या कंपन्या अन् स्टार्टअप आता नव्या मिशनची चौकशी करून टेंडरची विचारणा करीत आहेत. तर विदेशातूनही ही विचारणा होत असल्याने इस्त्रोने देशी अन् विदेशी कंपन्यांसाठी दोन स्वतंत्र यंत्रणा संकेतस्थळावर सुरू केल्या आहेत.

इस्त्रो आणि नासा एकत्र आले…

भारताने अवकाश तंत्रज्ञानात केलेली प्रगती पाहून अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासाने दोस्तीचा हात पुढे केला आहे. लवकरच इस्त्रो आणि नासा एकत्र येत असून, त्यांनी ‘निसार’ नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. इस्त्रो व नासाच्या आद्याक्षरांतून निसारची निर्मिती झाली आहे.आता या दोन्ही संस्था मिळून एक प्रयोगशाळा तयार करीत आहेत. ही प्रयोगशाळा अवकाशात सोडली जाणार असून, त्याद्वारे पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे. या नव्या मिशनसाठीही जगभरातील देश विविध उपकरणांच्या टेंडरसाठी अर्ज करीत आहेत.

हेही वाचा

उपोषणकर्त्यांची काळजी घेणे हे शासनाचे उत्तरदायित्व : मुंबई उच्‍च न्‍यायालय

मुंबई : महापालिकेत अभियंत्यांची भरती रखडली!

पाकिस्तानची डोकेदुखी वाढली!

Back to top button