पाकिस्तानची डोकेदुखी वाढली!

पाकिस्तानची डोकेदुखी वाढली!
Published on
Updated on

अडचणीच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानपुढे सध्या एक चिंताजनक समस्या उभी राहिली आहे. पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशातील लोक येथे रस्त्यावर उतरले आहेत. येथील नागरिक मागण्या मान्य न केल्यास आम्ही थेट कारगिलमध्ये जाऊ, असा इशारा देत आहेत. 'चलो कारगिल' असा नारा देत गिलगिट-बाल्टिस्तानच्या नागरिकांनी हा पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे.

पाकिस्तानातील आर्थिक आणि राजकीय स्थिती बिकट झालेली असताना आणि रोज नव्याने उद्भवणार्‍या संकटांतून मार्ग सापडत नसताना आता या देशापुढे आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात असणार्‍या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पाकिस्तानविरोधी कारवाया वाढल्या आहेत. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कराविरोधातील बंड अधिक तीव— झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील अल्पसंख्याक शिया मुस्लिमांमध्ये असणारा संताप आणि आक्रोश आता पराकोटीला पोहोचला आहे.

कट्टर सुन्नी संघटना आणि पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरुद्ध येथील अल्पसंख्याक शिया लोकांनी बंड केले आहे. या भागातील शिया संघटना पहिल्यांदाच लष्कराविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. भारतापासून 90 किमी अंतरावर असलेल्या स्कार्दूमधील शिया समुदायाचे लोक भारताकडे जाणारा कारगिल महामार्ग सुरू करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. त्यांना आता पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये राहायचे नसून भारतात जायचे आहे. यासाठी 'चलो कारगिल'चे नारे दिले जात असून या घोषणांनी हा प्रदेश दुमदुमून गेला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानची लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे. यापैकी 8 लाख शिया समुदायाचे लोक आहेत. या शियांची आकम—कता पाहून पाकिस्तानी लष्कराने 20 हजार अतिरिक्त सैनिक या परगण्यात तैनात केले आहेत.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आंदोलने, मोर्चे सतत होत असतात; पण यंदा पाकिस्तानच्या निषेधाच्या नावाखाली हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. 'चलो फिजा, चलो कारगिल'च्या घोषणा देणार्‍या या लोकांमधील निषेधाची भावना आणि रोष पाहता तेथील परिस्थिती कोणत्याही क्षणी गंभीर होऊ शकते. प्रश्न असा आहे की, अचानकपणे या भागातील नागरिकांमध्ये भारतात विलीन होण्याबाबतचा विचार तीव— का झाला आहे? याचे एक कारण म्हणजे, पाकिस्तानच्या प्रचलित ईशनिंदा कायद्यांतर्गत अलीकडेच झालेली शिया धर्मगुरूची अटक आणि शिक्षा. या अटकेमुळे गिलगिटमधील स्थानिक लोक प्रचंड संतापले असून तेथील स्थानिक नेत्यांनी पाकिस्तान प्रशासनाला गृहयुद्धाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी काही जण उघडपणे भारतात विलीनीकरणाची मागणी करू लागले आहेत. शिया समुदायाचे धर्मगुरू आगा बाकीर अल-हुसैनी यांच्यावर एका धार्मिक मेळाव्यात केलेल्या टिप्पण्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर

या मौलवींना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या निषेधार्थ स्कर्दूमधील शिया समाज रस्त्यावर उतरला आणि आंदोलन सुरू झाले.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या अपर कोहिस्तानच्या सुन्नीबहुल भागातही निषेध निदर्शने होत असून शिया मौलाना आगा बाकीर अल-हुसैनी यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. अटक न झाल्यास आंदोलन करून रस्ते अडवून वाहतूक विस्कळीत करू, अशी धमकीही तेथील आंदोलक देत आहेत. सुन्नी समाजाच्या या मागणीमुळे शिया समाज संतप्त झाला आणि त्यांनी मौलानाच्या अटकेच्या विरोधात स्कर्दू आणि परिसरात निदर्शने सुरू करत मुख्य महामार्ग रोखला. परिणामी, आजघडीला संपूर्ण गिलगिट-बाल्टिस्तानमधील परिस्थिती गुंतागुंतीची बनली असून हे आंदोलन कधीही मोठ्या हिंसाचाराचे रूप घेऊ शकते, असे सांगितले जात आहे.
शिया समुदाय पाकिस्तानच्या नवीन ईशनिंदा कायद्याच्या विरोधात आहे. या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल, तर कारगिलचे दरवाजे उघडा, जेणेकरून गिलगिट-बाल्टिस्तानमधील शिया भारतात आश्रय घेऊ शकतील, असा तेथील लोकांचा सूर आहे. या भागात

राहणार्‍या लोकांमध्ये 39 टक्के लोकसंख्या शिया आहे, तर 27 टक्के सुन्नी आणि 18 टक्के इस्माइली मुस्लिम आहेत. मौलाना आगा बाकीर अल-हुसैनी यांची स्कर्दू आणि आसपासच्या भागातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये गणना केली जाते. या मौलानांनी गिलगिट -बाल्टिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या चळवळींमध्ये भाग घेत त्या यशस्वीही केल्याचा इतिहास आहे. अलीकडील काळात सदर मौलाना शुद्ध पाण्यासाठी आंदोलन करताना दिसले. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक प्रशासन धास्तावले आहे. मौलानांना झालेली अटक ही राजकीय असल्याचे या भागातील लोकांचे म्हणणे आहे. अलीकडेच एका धार्मिक मेळाव्यात मौलानांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे पाकिस्तानातील सुन्नींच्या भावना दुखावल्या गेल्या. परिणामी, त्यांनी मौलानांवर ईशनिंदा केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. गिलगिट-बाल्टिस्तानमधील शिया समुदायाचे म्हणणे आहे की, पाकिस्तान सरकारकडून पुन्हा त्यांच्या विरोधात कट रचला जात आहे.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये असणार्‍या शिया-सुन्नी या प्रमुख मुस्लिम पंथांमधील संघर्षाला मोठा इतिहास आहे. 1988 च्या काळात पाकिस्तानात झिया उल हक यांची राजवट होती तेव्हा 400 शिया मुस्लिमांची कत्तल घडवून आणण्यात आली होती. 2012 च्या सुमारास पाकिस्तान सरकारच्या ईशार्‍यावर तेथे सिपाह-ए-सहबा सारख्या शियाविरोधी संघटना तयार झाल्या आणि त्यांनी पुढे गिलगिट-बाल्टिस्तानला आश्रयस्थान बनवले. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सुन्नी लोकसंख्या वाढवण्यासाठी पाकिस्तानचे राज्यकर्ते दीर्घकाळापासून काम करत आहेत. त्यासाठी शिया समाजावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. शिया लोकांना त्यांच्या जमिनी विकायला भाग पाडले जात आहे. आता नवीन ईशनिंदा कायदा हे हत्यार म्हणून वापरले जात असल्याचा अनुभव शिया लोकांना जाणवत आहे. गेल्या महिन्यातही गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात निदर्शने केली होती. येत्या काळात या भागातील नागरिकांचा भारतात समाविष्ट होण्याबाबतचा जोर असाच वाढत राहिल्यास पाकिस्तानसाठी ती डोकेदुखी ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news