Aditya-L1 Mission | ‘आदित्य-L1’ प्रक्षेपणासाठी सज्ज; ISRO ने दिली मोठी अपडेट

Aditya-L1 Mission | ‘आदित्य-L1’ प्रक्षेपणासाठी सज्ज; ISRO ने दिली मोठी अपडेट

पुढारी ऑनलाईन: 'आदित्य-L1 मिशन' प्रक्षेपणाची तयारी प्रगतीपथावर असून, अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे. चांद्रयान-३ मोहिमेनंतर आता भारत सूर्यमोहिमेसाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती इस्रोने त्याच्या 'X' वरून (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची ही पहिली अंतराळ मोहीम असून, यासाठी इस्रो सज्ज असल्याचे अपडेट इस्रोने (Aditya-L1 Mission) आज (दि.३०) दिले आहेत.

इस्रोने दिलेल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो 'आदित्य-L1' चे प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज आहे. आदित्य-L1 चे शनिवारी २ सप्टेंबर रोजी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांना श्रीहरीकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून प्रक्षेपण पाहण्याची संधी उपलब्ध आहे.

यासाठी नोंदणी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp  या लिंकवर सुरू असल्याची माहिती देखील इस्रोने (Aditya-L1 Mission) दिली आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून 'पीएसएलव्ही-एक्सएल' या महाबली रॉकेटच्या माध्यमातून 'आदित्य एल-1' अंतराळात पाठवले जाईल. 'इस्रो' या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ही पहिली सौरमोहीम आहे. मोहिमेंतर्गत येत्या ४ महिन्यांत पृथ्वीपासून 15 लाख कि.मी. अंतरावर 'आदित्य एल-1' सूर्याच्या प्रभामंडळातील 'एल-1' बिंदूवर पोहोचणार आहे, असेही इस्रोने सांगितले होते.

सूर्याचा अभ्यास करणारी 'आदित्य एल-1' ही पहिली अंतराळआधारित भारतीय प्रयोगशाळा आहे. सूर्याभोवती असलेल्या कोरोनाचे (प्रभामंडळ) निरीक्षण, अध्ययन हा उपग्रह करेल. सूर्य-पृथ्वीदरम्यान पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष कि.मी., तर सूर्यापासून 148.5 द.ल.कि.मी. अंतरावर असलेल्या 'एल-1' अर्थात लॅग्रेंज बिंदूवर (लॅग्रेंज पॉईंट) राहून सौरवादळांचा स्रोत काय, तीव्रता काय, परिणामकारता काय, या सगळ्यांचे गणित हा उपग्रह समजून घेईल. या बिंदूवर पोहोचण्यासाठी सुमारे १०० ते १२० दिवस म्हणजे साधारण ४ महिने लागतील, असेही इस्रोने यापूर्वी स्पष्ट केले होते.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news