Closing Bell | दोन दिवसांचा तोट्याचा सिलसिला मोडला; सेन्सेक्स ११० अंकांनी वाढून बंद, जाणून घ्या आजचे मार्केट | पुढारी

Closing Bell | दोन दिवसांचा तोट्याचा सिलसिला मोडला; सेन्सेक्स ११० अंकांनी वाढून बंद, जाणून घ्या आजचे मार्केट

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातील वाढीचा मागोवा घेत आज सोमवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीत व्यवहार केला. एकूणच सेन्सेक्स आणि निफ्टीने गेल्या दोन सत्रांतील तोट्याचा सिलसिला मोडला आहे. सेन्सेक्स ११० अंकांनी वाढून ६४,९९६ वर बंद झाला. तर निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह १९,३०६ वर स्थिरावला. दरम्यान, आज रिलायन्सचा शेअर १.११ टक्क्यांनी घसरून २,४४२ रुपयांवर आला.

आज एमएफसीजी (FMCG) आणि आयटी वगळता सर्व क्षेत्रांत खरेदी दिसून आली. क्षेत्रीय निर्देशांकात रिअल्टी आणि कॅपिटल गुड्स प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही दिवसभरात प्रत्येकी ०.५ टक्क्यांची वाढ झाली. (Share Market Closing Bell)

जियो फायनान्सियलमध्ये सुधारणा

सेन्सेक्स आज ६४,९०८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,२१३ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर जियो फायनान्सियलचा शेअर आज २ टक्क्यांहून अधिक वाढून २१७ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो २११ रुपयांवर स्थिरावला. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर हा शेअर घसरला होता. त्यानंतर आज या शेअरमध्ये सुधारणा दिसून आली. एलटी, एम अँड एम, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. मारुती, सन फार्मा, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक हे शेअर्स आज वाढले. तर एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, आयटीसी, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर पॉवर ग्रिड, एलटी, एम अँड एम, बीपीसीएल, सिप्ला हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर एचसीएल टेक, हिंदाल्को, अदानी एंटरप्रायजेस, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले.

झोमॅटोचे शेअर्स वधारले

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato shares) चा शेअर बीएसईवर सोमवारच्या ट्रेडमध्ये ५.५ टक्के वाढून ९६ रुपयांवर पोहोचला. काउंटरवर ब्लॉक डील झाल्याच्या वृत्तात हा शेअर वधारला आहे. जपानी टेक दिग्गज सॉफ्टबँक झोमॅटोचे शेअर्स ऑफलोड करण्याची शक्यता आहे असे यापूर्वी CNBC-TV18 ने वृत्त दिले होते.

राइस स्टॉक्स घसरले, ‘हे’ ठरले कारण

सरकारने निर्यातीशी संबंधित निर्बंध लागू केल्याच्या वृत्तानंतर सोमवारच्या व्यवहारात राइस स्टॉक्स घसरले. एनएसईवर कोहिनूर फूड्स, केआरबीएल, GRM ओव्हरसीजचे शेअर्स घसरले. यातील काही शेअर्स १ आणि ४ टक्क्यांपर्यंत घसरले. प्रति टन १२०० डॉलर (सुमारे १ लाख रुपये) च्या खाली बासमती तांदूळ निर्यात न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रविवारी वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की ट्रेड प्रमोशन बॉडी अपेडाला १,२०० प्रति टन डॉलरपेक्षा कमी कराराची नोंदणी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रति टन १,२०० डॉलरचा असलेला विद्यमान करार स्थगित ठेवण्यात आले आहेत. (Share Market Closing Bell)

आशियाई बाजारात तेजी

अस्थिर बाजारपेठेला चालना देण्यासाठी चीनने स्टॉक ट्रेडिंगवरील स्टॅम्प ड्युटी अर्ध्यावर आणल्याचे सांगितल्यानंतर आशियाई बाजार आज १ टक्क्याने वाढले. दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाईचा सामना करण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केल्यानंतर अमेरिकेतील बाजार शुक्रवारी अस्थिरता दिसून आली होती.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कायम

गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात विक्रीचा मारा सुरू आहे. स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (Foreign institutional investors) शुक्रवारी निव्वळ आधारावर ४,६३८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,४१४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button