Diwali Gold : धनत्रयोदशीला ७५ हजार कोटींची सोन्याची विक्री | पुढारी

Diwali Gold : धनत्रयोदशीला ७५ हजार कोटींची सोन्याची विक्री

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: धनत्रयोदशीच्या ( Diwali Gold )  दिवशी देशभरात ७५ हजार कोटी रुपये किंमतीच्या १५ टन सोन्याची विक्री झाली असल्याची माहिती कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (सीएआयटी) देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक १५०० कोटी रुपयांची विक्री झाली असून दक्षिण भारतात हेच प्रमाण २ हजार कोटी रुपयांचे आहे. दिल्लीमध्ये १ हजार कोटी तर उत्तर प्रदेशात ६०० कोटी सोन्याची विक्री झाली आहे.

सोन्या आणि चांदीचे दर नरम असल्यामुळे खरेदीला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीला ( Diwali Gold )  मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली आहे. सराफ बाजारासाठी हे अनुकूल संकेत असल्याचे सीएआयटीचे म्हणणे आहे. सोन्याचा विचार केला तर दाग-दागिन्यांबरोबरच नाण्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

कोरोना संकटातून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने देखील खरेदीला उधाण आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ४६ ते ४७ हजार रुपयांच्या आसपास स्थिर आहेत. गत ऑगस्ट महिन्यात हेच दर ५७ हजार रुपयांपर्यंत गेले होते.

केवळ सराफ बाजारात जाऊनच नव्हे ऑनलाईन माध्यमातूनही सोन्याची विक्री वाढली आहे. गत एक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या धनत्रयोदशीदिवशी ग्राहकांच्या संख्येत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button