स्वारगेट पोलिसांच्या दिव्याखाली अंधार..! बदलून गेल्यानंतर देखील 'तो' कर्मचारी कर्तव्यावर | पुढारी

स्वारगेट पोलिसांच्या दिव्याखाली अंधार..! बदलून गेल्यानंतर देखील 'तो' कर्मचारी कर्तव्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा

स्पा सेंटरच्या नावाखाली शंकरशेठ रोडवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर दोन दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली. वेश्या व्यवसाय सुरू असलेले ठिकाण स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत आहे. तर तेथे कारवाई करणारे पथक दुसर्‍याच पोलिस ठाण्याचे आहेत. सामाजिक विभागाकडूनदेखील ही कारवाई झालेली नाही. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍याने फिर्याद दिली आहे, तर घटनास्थळाला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षकांसह स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस आयुक्तांनी भेट दिली आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आले तर त्याची माहिती संबंधीत पोलिस ठाण्याला देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र तरी देखील त्या पोलिस ठाण्याकडून कारवाई झाली नाही तर गुन्हे शाखा व विशेष पथकांकडून कारवाई केली जाते. अशीच कारवाई स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली आहे.

स्वारगेट पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी तेथून बदलून गेल्यानंतर देखील प्रत्येक महिन्याच्या तारखेला खास कामासाठी कर्तव्यावर हजर होतो आहे. सद्या त्याची नेमणूक परिमंडळ एकमधील एका मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आहे. संबंधीत कर्मचारी वरिष्ठांचा मर्जीवान आहे. त्यामुळे त्याचीच हद्दीत चलती असल्याचे समजते. वेश्या व्यवसाय, मटका, जुगार, दारू विक्री अशा विविध अवैध धंद्यांना तोच अभय देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पोलिस आयुक्तांनी अवैध धंद्याच्या बाबतीत कडक धोरण अवलंबिले आहे. हद्दीतील अवैध धंद्यांना ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसे त्यांच्याकडून हमीपत्रदेखील घेण्यात आले आहे. मागील आठवड्यात कारवाई करत आयुक्तांनी तशाप्रकारचा इशारा देखील दिला आहे. मात्र अशातच हा प्रकार समोर आल्यामुळे संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button