Anti Drug Action : मागील तीन वर्षात १३१ कोटींचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त | पुढारी

Anti Drug Action : मागील तीन वर्षात १३१ कोटींचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मागील तीन वर्षात मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत ( Anti Drug Action ) २०८ गुन्हे दाखल केले असून २९८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत १३१ कोटींचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील तीन वर्षात अंमली पदार्थ आणि अन्य उत्तेजक पदार्थ अंतर्गत माहिती विचारली होती. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदिप काळे यांनी प्रादेशिक विभागनिहाय माहिती उपलब्ध करुन दिली आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षातील ही माहिती आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थात गांजा, चरस, एमडी, कोकेन, एमडीएमए, कोडेइन, ओपीम, एलएसडी पेपर्स, अल्परझोअम, नेत्रावेत टॅब्लेट आदींचा समावेश आहे.

सर्वाधिक मुद्देमाल २०२१ मध्ये जप्त ( Anti Drug Action )

२०१९ आणि २०२० च्या तुलनेत २०२१ या वर्षात अंमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला असून २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत कारवाई सात पटीने वाढली आहे. सन २०१९ मध्ये ३९४.३५ किलो मुद्देमाल जप्त केला असून यात ३४३ स्ट्रीप्स, ७५७७ बॉटल्स आणि १५५ डॉट मिली ग्राम आहे. याची मालाची किंमत २५.२९ कोटी इतकी आहे. सन २०२० मध्ये ४२७.२७७, किलो मुद्देमाल जप्त केला असून यात ५१९१ बॉटल्स, ६६ हजार टॅब १४ डॉट मिली ग्राम आहे. याची किंमत २२.२४ कोटी इतकी आहे. २० ऑक्टोबर २०२१ मध्ये २५९२.९३ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात १५ हजार ८३० बॉटल्स व १८९ एलएसडी पेपर्स असून या मालाची किंमत ८३.१९ कोटी इतकी आहे.

सर्वाधिक गुन्हे आणि अटक आरोपी २०२१ मध्ये

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन २०१९ आणि सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंद केले. या वर्षात अटक आरोपींची संख्याही सर्वाधिक आहे. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण ९४ गुन्हे नोंद झाले असून १३७ आरोपींना अटक झाली आहे. सन २०१९ मध्ये ७० गुन्ह्यात १०३ आरोपींना अटक करण्यात आली . सन २०२० मध्ये फक्त ४४ गुन्ह्याची नोंद झाली व ५८ जणांना अटक झाली होती.

Back to top button