मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर शरद पवारांचं उत्तर; म्हणाले, त्यांना महत्व… | पुढारी

मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर शरद पवारांचं उत्तर; म्हणाले, त्यांना महत्व...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईडी कारवाई सुरू असताना पक्षाला हस्तक्षेप करता येत नाही. आमच्यातील काहीजणांना तरूंगात जावं लागलं. पण त्यांच्यावर कारवाई सुरू होऊन नंतर थांबली. त्यांनी कुणाशी संवाद साधला माहिती नाही. आमच्यातून गेलेल्यांची नावं घेवून त्यांना महत्व कशाला द्यायचं, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली.

आमच्यातील काही आमदार बाजूला गेले ही वस्तूस्थिती आहे. मात्र पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील राज्याचे अध्यक्ष आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीत फूट नसल्याचा पुनरूच्चारही शरद पवार यांनी यावेळी केला. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची शुक्रवारी कोल्हापूरात पहिली सभा झाली. त्यानंतर आज (दि.२६) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीने नोटीसा पाठवल्या. मात्र पक्षाला कोणाच्याच बाबतीत हस्तक्षेप करता येत नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाबतीतही पक्षाने हस्तक्षेप केला नाही, ते तरूंगात गेले. मात्र जे तुरूंगात गेले नाहीत ते असं भाष्य करतात. त्यांनी कुणाशी सुसंवाद साधला माहिती नाही. पण त्यांच्यावर कारवाई झाल्याचं वाचलं आणि त्यानंतर पुढची अॅक्शन थांबली, याचा अर्थ काहीतर सुसंवाद झाला असेल, असा टोला पवार यांनी हाणला.

जगाच्या दृष्टीने भारताची प्रतिमा वाढविण्याचं काम चांद्रयान ३ मुळे झालं. यामध्ये शास्त्रज्ञांच मोठं योगदान आहे. त्यांनी हिंदुस्थानची प्रतिष्ठा वाढवली. त्याशिवाय चंद्रावरच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. यामुळे संपूर्ण जगाला चंद्रावरची माहिती सांगायला मदत होईल, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना निवडणूका नको आहेत, निवडणुका घेतल्या की सत्ताधाऱ्यांना जनमत काय ते कळेल, अशी टीकाही पवार यांनी केली.

हेही वाचा : 

 

Back to top button