Hasan Mushrif : आयटी पार्कसाठी जागा राखीव ठेवा : मंत्री मुश्रीफ | पुढारी

Hasan Mushrif : आयटी पार्कसाठी जागा राखीव ठेवा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Hasan Mushrif : आयटीपार्कसाठी 32 एकक्षर जागा राखीव ठेवा, अशी सुचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला केली. प्रत्येक बैठकीत तेच प्रश्न, तीच उत्तरे असे किती दिवस चालणार? असा सवाल करत प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, असेही त्यांनी सांगितले.

आंबेओहळमधील उर्वरित पुनर्वसन, दूधगंगा प्रकल्पग्रस्त लाभार्थी, वाकी-वाडदे वसाहत तेथील अतिक्रमण, मळगे खुर्दमधील गायरानचा प्रश्न, हसूर बुद्रुक येथील मूळ गावठाणचा प्रश्न तसेच गडहिंग्लज येथील झोपडपट्टीतील मोजणीबाबत तसेच इतर विविध विकास कामांचा आढावा मंत्री मुश्रीफ यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.

दूधगंगा प्रकल्पातील संपादन करून शिल्लक राहिलेल्या जमिनीबाबतच्या प्रश्नासाठी वन विभागाशी चर्चा करणे गरजेचे असून, मंत्रालयीन स्तरावर याबाबतची बैठक आयोजित करू, असे मुश्रीफ यांनी सांगितले. आंबेओहळ येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व त्यांची न्यायालयीन प्रक्रिया याबाबतची पाहणी करण्यासाठी तातडीने गावस्तरावर भेट देऊन प्रश्न मार्गी लावावेत, असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता संबंधितांबरोबर बैठक घेतील, असेही त्यांनी सांगितले.

विविध गावांच्या पुनर्वसनानंतर निर्माण झालेल्या वसाहतीतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा. वाकी-वाडदे, सिद्धनेर्ली, बाचणी अशा गावांतील लाभधारकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मूळ गावांमधील सर्व्हे पूर्ण करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम सुरू आहे. नव्याने वसाहती व पुनर्वसित गावांतही प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया मंजूर झाल्याचे यावेळी प्रशासनाने सांगितले. गडहिंग्लज येथील झोपडपट्टीतील तातडीने मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले.

हिरण्यकेशी नदीतील वाळू उपसा धोरणासंदर्भात गडहिंग्लजच्या नागरिकांनी बैठकीत विविध मागण्या मांडल्या. यावेळी गावाकडून उपस्थितीबाबत निळी रेषा व लाल रेषा यामध्ये नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता पाटबंधारे स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे आदी विविध अधिकारी उपस्थित होते.

Hasan Mushrif : ‘आयटी’मुळे दोन ते अडीच लाख नोकर्‍या उपलब्ध होतील

बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी आयटी पार्क कोल्हापुरात झाल्यास सुमारे दोन ते अडीच लाख नोकर्‍या उपलब्ध होतील, असे सांगितले. यामुळे या पार्कसाठी जागा राखीव ठेवा असेही त्यांनी सांगितले.

Hasan Mushrif : नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र होणार कोल्हापुरात

महाराष्ट्राचे एकमेव आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे आहे. बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र कोल्हापुरात होण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेची तरतूद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या. हे विभागीय केंद्र कोल्हापुरात झाल्यास कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर तसेच कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल, असेही त्यांनी दिले.

हे ही वाचा:

Back to top button