अँटिलिया स्फोटक प्रकरण : माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मांना जामीन मंजूर | पुढारी

अँटिलिया स्फोटक प्रकरण : माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यातील बहुचर्चित अँटिलिया स्फोटक प्रकरणी अटक झालेले मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जून २०२१ मध्‍ये त्‍यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. ( Antilia bomb scare case )

प्रख्‍यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्‍या मुंबईतील निवासस्थान अँटिलिया बाहेर स्फोटकांनी भरलेली कार पार्क करण्‍यात आली होती. ही कार हिरे व्‍यापारी मनसुख हिरेन यांची होती. काही दिवसांनी मनसुख हिरेन यांची हत्‍या झाल्‍याचे उघड झाले. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना जून २०२१ मध्‍ये अटक केली होती. प्रदिप वर्मा यांनी दाखल केलेले अनेक जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले होते. ( Antilia bomb scare case )

पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना ५ जून रोजी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. यानंतर त्‍यांनी जामीनासाठी दाखल केलेल्‍या याचिकेत म्हटले होते की, “त्यांच्या पत्नीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तत्‍काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. यासाठी जामीन मंजूर करावा.” बुधवार (दि.२३) न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला

प्रदीप शर्मा १९८३ मध्ये मुंबई पोलिसात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित 300 हून अधिक चकमकींमध्ये त्यांचा सहभाग होता. ११३ प्रत्‍यक्ष चकमकी त्‍यांच्‍या नावावर आहेत. मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी अशी त्‍यांची ओळख होती. शर्मा हे मुंबईचे माजी सहाय्‍यक पोलीस निरीक्षक आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाजे याचे निकवटवर्ती म्‍हणूनही ओळखले जातात.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button