

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : उद्योगपती मुकेश अंबानी यांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठीच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ उभी केली. या कटात माजी चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मासह सेवेतील पाच आणि निवृत्त पोलिसांचा सहभाग होता. वाझे याने स्वतः ही गाडी चालवत अंबानींच्या निवासस्थानाजवळ उभी केली.
एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात अॅन्टिलियासमोरील स्फोटक स्कॉर्पिओचा संपूर्ण उलगडा करताना हे सर्व कारस्थान सचिन वाझेने कसे घडवून आणले याचे विस्तृत वर्णन दिले आहे.
अंबानी कुटुंबाला धमकी देण्यासाठी वाझे यानेच स्कॉर्पिओमध्ये एक चिठ्ठी ठेवली. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी टेलिग्राम अॅपवर एक मेसेज पोस्ट करण्यात आला. जैश-उल-हिंद ही दहशतवादी संघटना स्फोटके लपवण्याची जबाबदारी घेत असल्याचे भासवण्यात आले. स्कॉर्पिओतील स्फोटके उघड झाल्यानंतर घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचला तो सचिन वाझेच. त्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतःकडे हस्तांतरित करून घेतला. अंबानी कुटुंब आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याच्या सुनियोजित षड्यंत्राचा भाग म्हणून त्याला या संपूर्ण प्रकरणाची मोडतोड करणे त्यामुळे शक्य होणार होते.
मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ या कामासाठी वापरायचे ठरल्यानंतर या गाडीचा नोंदणी क्रमांक वाझेनेच बदलला. नीता अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका रेंज रोव्हरचा नोंदणी क्रमांक त्यासाठी वापरण्यात आला. ही स्कॉर्पिओ डॉ. सॅम न्यूटन यांची असल्याने व या गाडीचे नूतनीकरण करण्यापोटी पैसे न दिल्याने ती हिरेनच्या ताब्यात होती, याची कल्पना वाझेला होती.
ती गाडी वाझेने विकत घेतली. 25 फेब्रुवारीला दोघे ठाण्यातील वाझेच्या निवासस्थानाहून स्कॉर्पिओतून रात्री 1 वाजता निघाले. मुलुंड टोलनाका पार केल्यानंतर सचिन वाझेनी चेंबूरमध्ये गाडी चालवायला स्वत:कडे घेतली. आपण कुठे जात आहोत, असे सहकार्याने विचारले तेव्हा हे सिक्रेट सीआययू मिशन असल्याचे वाझे म्हणाला. पहाटे 02 वाजून 10 मिनिटांनी वाझेने अॅन्टिलियाजवळ गाडी पार्क केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते.
अॅन्टिलियाजवळ स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर सचिन वाझे पाच मिनिटे स्कॉर्पिओत बसून होता. नंतर स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूने तो बाहेर पडला आणि सहकार्याने पार्क केलेल्या इनोव्हाच्या दिशेने चालत गेला. सहकार्यासोबत इनोव्हातून भायखळ्याला पोहोचल्यानंतर आपले मुंबई पोलीस दलाचे ओळखपत्र सापडत नसल्याचे वाझेच्या लक्षात आले. कार्यालयाच्या ड्रॉव्हरमध्येही सहकार्याला ते सापडले नाही. 03 वाजून 40 मिनिटांनी दोघे वाझेंच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुन्हा एकदा सचिन वाझेंनी कारमध्ये शोध घेतला पण ओळखपत्र सापडले नाही.
अंबानींच्या घराजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्येच ते राहिले असावे, अशी भीती वाझेला वाटली. दोन तासांनी वाझे पुन्हा स्कॉर्पिओजवळ पोहोचला. कुर्ता घातलेली आणि मास्क असणारी एक व्यक्ती पहाटे 04 वाजून 30 मिनिटांनी पुन्हा घटनास्थळी येऊन स्कॉर्पिओची पाहणी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते. आरोपपत्रात हे ओळखपत्र शेवटी सापडले की नाही याचा उल्लेख नाही.
स्कॉर्पिओतील स्फोटकांची बातमी सुरू झाल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला. स्कॉर्पिओजवळ प्रचंड ताफा तैनात होता आणि सचिन वाझे चिंतेत होता. साध्या कपड्यांमध्ये असलेला सचिन वाझे वारंवार गाडीजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता आणि अँटिलियाचे सुरक्षारक्षक तसे करू नको, असे त्याला सांगत होते. गाडीत स्फोटके असल्याचे उघड झाल्यानंतरही वाझे वारंवार गाडीजवळ जात होता. शेवटी आमचा जीव धोक्यात का घालत आहात? असे त्याला एका कर्मचार्याने विचारल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ही गाडी अॅन्टिलियासमोर पार्क करताना वाझेसोबत पोलीस दलाचा एक चालकही होता. आपण कुठे जात आहोत, असे त्याने वाझेला विचारले. हे सिक्रेट सीआययू मिशन आहे. (सीआययू म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिट अर्थात वाझे प्रमुख असलेले पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाचे कार्यालय) या चालकाने दुसर्या दिवशी जेव्हा ही बातमी पाहिली, तेव्हा त्याला धक्काच बसला. परंतु, वाझेने त्यालाही याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली, असेदेखील या आरोपपत्रात म्हटले आहे.