NIA : 'मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेनं प्रदीप शर्मांना ४५ लाखांची सुपारी दिली' | पुढारी

NIA : 'मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेनं प्रदीप शर्मांना ४५ लाखांची सुपारी दिली'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवास्थानाजवळ स्फोटके ठेऊन धमकी प्रकरण आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसूख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा दावा एनआयएने उच्च न्यायालयात केला.

आरोपी प्रदीप शर्मा यांच्या इतर आरोपींसमवेत कट रचण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये बैठका झाल्याचे एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मनसूख हिरेन यांची हत्या करण्यासाठी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेनं ४५ लाखांची सुपारी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

एनआयएनकडून प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध करण्यात आला. प्रदीप शर्मा निष्पाप नसून त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केले असून गुन्हेगारी कटांमध्ये, खून आणि दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या विभागीय खंडपीठाने या प्रकरणात पुढील सुनावणी १७ जुलै रोजी घेण्याचे निश्चित केलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. नंतर झालेल्या चौकशीत पार्क केलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ५ मार्चला ते मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, लोकांना धमकावण्याच्या गँगमध्ये प्रदीप शर्मा यांचा सक्रीय सहभाग होता. यामध्ये अंबानी कुटुंबाचा सुद्धा समावेश आहे. तसेच मनसुख हिरेनच्या हत्येमध्येही समावेश आहे.

मनसुख हिरेन यांना अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याच्या कटाची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे ते या प्रकरणाची भांडाफोड करू शकतात याची भिती आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना होती. त्यामुळे रचलेला कट साध्य होणार नाही असे दोघांना वाटू लागले होते.

प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून १७ जून २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शर्मा आणि इतर आरोपींनी युएपीए कायद्यान्वये गंभीर गुन्हा केल्याचेही एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button