प्रशांत भूषण : ‘धार्मिक तुष्टीकरणाच्या बाबतीत केजरीवाल भाजपला मागे टाकत आहेत’ | पुढारी

प्रशांत भूषण : ‘धार्मिक तुष्टीकरणाच्या बाबतीत केजरीवाल भाजपला मागे टाकत आहेत’

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

धार्मिक तुष्टीकरणाच्या बाबतीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाला मागे टाकत असल्याची टीका ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मंगळवारी सोशल मीडीयाच्या माध्यमातून केली. गोवा राज्यात आम आदमी पक्षाची सत्ता आली तर येथील वरिष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असे आश्वासन अलिकडेच केजरीवाल यांनी दिले होते. त्याचा संदर्भ देत भूषण यांनी ही टीका केली.

गोव्यात आप चे सरकार आले तर हिंदू लोकांना अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केली जाईल. ख्रिश्चन लोकांना वेलंकनी तर मुस्लिमांना अजमेर यात्रेसाठी मोफत व्यवस्था केली जाईल. याशिवाय ज्या लोकांचा शिर्डी साईबाबावर विश्वास आहे, त्यांना शिर्डी दर्शनाची व्यवस्था केली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले होते. अशी यात्रा घडवून आणण्यासाठी पैशाची कमतरता नसल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले होते. त्यांच्या या आश्वासनांचा समाचार घेताना प्रशांत भूषण म्हणतात की, धार्मिक तुष्टीकरणाच्या बाबतीत केजरीवाल भाजपला मागे टाकत आहेत. घटना आणि सरकारमध्ये धार्मिक घडामोडींचा अंतर्भाव होता कामा नये. पण त्याची केजरीवाल यांना चिंता राहिलेली नाही. केजरीवाल यांच्यावर टीका करणारे प्रशांत भूषण हे आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. मात्र केजरीवाल यांच्यासोबत मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम केला होता.

 

Back to top button