Indian Rupee | डॉलरच्या तुलनेत रुपया धडाम, जाणून घ्या रुपया कमकुवत होण्याची कारणे | पुढारी

Indian Rupee | डॉलरच्या तुलनेत रुपया धडाम, जाणून घ्या रुपया कमकुवत होण्याची कारणे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; अमेरिकेचे कर्जरोखे उत्पन्न आणि डॉलर निर्देशांकात वाढ झाल्यामुळे भारतीय रुपया (Indian Rupee) सोमवारी डॉलरच्या तुलनेत ८३ च्या खाली आला. ऑक्टोबर २०२२ नंतर भारतीय चलनाची ही निचांकी पातळी आहे. अमेरिकन डॉलर इंडेक्स ह इतर सहा चलनांच्या तुलनेत अमेरिकन चलनाची ताकद मोजतो. डॉलर इंडेक्स वाढून १०३ च्या स्तरावर पोहोचला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या सर्वेक्षणात दीर्घकालीन महागाई वाढीत अल्प घट दिसून आली आहे तरीही अमेरिकेचे १० वर्षीय कर्जरोखे उत्पन्न ४.१८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

आज सकाळी ११ वाजता डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.९२५० वर होता. ट्रेडर्सच्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत डॉलरची विक्री करण्यापूर्वी रुपयाने ८३.०७२५ चा निचांक पातळी गाठली होती.

आठवड्याच्या सुरूवातीलाच आशियाई चलने ०.२ आणि ०.६ टक्क्यांनी खाली आली आहेत. चीनचे युआन डॉलरच्या तुलनेत ७.२७७५ पर्यंत घसरले आहे. युवान चलनाची ही दीड महिन्यांतील निच्चांकी पातळी आहे. (Indian Rupee)

रुपया कमकुवत होण्याचे कारण

शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी मजबूत होऊन ८२.८४ रुपयांवर बंद झाला होता. डॉलरच्या तुलनेत मागणी आणि पुरवठा यावर रुपयाचे मूल्य निश्चित होते. त्याचबरोबर देशाच्या आयात आणि निर्यातीवरही त्याचा परिणाम होतो. प्रत्येक देश परकीय चलनाचा साठा राखून ठेवतो. यातून देशात आयात होणाऱ्या वस्तूंचे पैसे दिले जातात. दर आठवड्याला रिझर्व्ह बँक यासंबंधीची आकडेवारी जाहीर करते. परकीय चलनाच्या साठ्याची स्थिती काय आहे आणि त्या काळात देशात डॉलरची मागणी कशी आहे, यावर रुपयाची ताकद अथवा त्याचा कमकुवपणा ठरतो.

डॉलर मजबूत झाल्यास काय होतो परिणाम

देशांतर्गत गरजेच्या सुमारे ८० टक्के कच्च्या तेलाची आयात करावी लागते. यासाठी भारताला अधिक डॉलर खर्च करावा लागतो. यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव येतो. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होतो. डॉलर मजबूत झाला तर देशाला जास्त किंमत मोजावी लागते. जर डॉलर स्वस्त झाला तर थोडासा दिलासा मिळतो. दररोजच्या या आर्थिक घडामोडीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती बदलत राहते.

 हे ही वाचा :

Back to top button