पुढारी ऑनलाईन : आपचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांचे राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
दिल्ली सेवा विधेयकाबाबत पाच खासदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी आप खासदारावर ही कारवाई करण्यात आली आहे. राघव चड्ढा यांच्यावर खासदारांचा समावेश असलेल्या समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव त्यांच्या मंजुरीशिवाय ठेवल्याचा आरोप आहे, जे नियमांचे उल्लंघन आहे. आता विशेषाधिकार समिती या प्रकरणाची चौकशी करेल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत राघव चड्ढा राज्यसभेतून निलंबित राहणार आहेत, असेही धनखड यांनीस्पष्ट केले आहे.
विशेषाधिकार समितीचा अहवाल मिळेपर्यंत मी राघव चड्ढा यांना विधान परिषदेच्या सेवेतून निलंबित करत असल्याचे धनखड यांनी म्हटले आहे. यापूर्वी २४ जुलै, २०२३ रोजी आप खासदार संजय सिंह यांचेही केलेले निलंबन कायम राहिल. जोपर्यंत विशेषाधिकार समितीच्या शिफारशीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे, असे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले.