मनमोहन सिंग व्हीलचेअरवर राज्यसभेत; भाजप म्‍हणाले… | पुढारी

मनमोहन सिंग व्हीलचेअरवर राज्यसभेत; भाजप म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली सेवा विधेयक सोमवारी (दि.७) राज्यसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने १३१ मतं तर विरोधात १०२ मतं पडली. हे विधेयक सभागृहात मांडत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग चर्चेत भाग घेण्यासाठी व्हीलचेअरवर राज्यसभेत पोहोचले. त्यांची तब्येत खराब असताना आणि वयाच्या नव्वदीतही त्यांनी कामकाजात भाग घेणे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला. काँग्रेसने त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे कौतुक केले असतानाच भाजपने मात्र याला ‘लाजिरवाणे’ म्हटले आहे.

भाजपची काँग्रेसवर बाेचरी टीका

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवर संसदेत पोहोचल्यावरून भाजपने काँग्रेसवर बाेचरी टीका केली. ‘केवळ आपली बेईमान युती जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसने एका माजी पंतप्रधानांना रात्री उशिरा पर्यंत तब्येत खराब असतानाही व्हीलचेअरवर बसवून ठेवले. हे खूप लाजिरवाणे आहे,’ असे भाजपने म्हटले आहे.

भाजपच्या या टीकेला काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग यांचे लोकशाहीप्रती असलेले समर्पण हा देशाच्या संविधानावरील विश्वासाचा पुरावा आहे. भाजपने आपल्या वडिलधाऱ्यांना मानसिक कोमात ढकलले असेल, पण आमचे वडीलच आमची प्रेरणा आणि धैर्य आहेत. तुमच्या गुरुला काहीतरी यातून शिकायला सांगा, असा टोला त्यांनी लगावला.

‘आप’ कडून डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवर संसदेत आल्याने आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, डॉ.मनमोहन सिंग हे आज राज्यसभेत प्रामाणिकपणाचे उदाहरण म्हणून उभे राहिले आणि काळ्या अध्यादेशाविरोधात मतदान केले. लोकशाही आणि संविधानाप्रती त्यांची अतूट बांधिलकी ही सर्वांना प्रेरणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चड्ढा यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button