Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-३ शनिवारी करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश! ISRO ची माहिती | पुढारी

Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-३ शनिवारी करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश! ISRO ची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: चांद्रयान-३ ने मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला होता.  यानाने पृथ्वीची कक्षा सोडल्यापासून आत्तापर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले आहे.  चांद्रयान-३ चंद्राच्या (Chandrayaan-3 Mission) आणखी जवळ पोहचले असून, ते उद्या (५ ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत जाणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे.

भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून चिन्हांकित केला जात आहे. चांद्रयान-3 हे ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या प्रभावक्षेत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे यान अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज असून, उद्या चांद्रयानाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला जाणार आहे, असेही इस्रोने (Chandrayaan-3 Mission) त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

यानंतर चांद्रयान-३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. यापूर्वी ते चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणार आहे. ‘चांद्रयान-3’मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या किरणोत्सर्गाचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात, यामागचे रहस्य ‘इस्रो’ शोधून काढणार आहे. तसेच चंद्रावरील मातीचाही अभ्यास केला जणार आहे, असेही यापूर्वी दिलेल्या माहितीत इस्रोने  म्हटले आहे.

Chandrayaan-3 Mission: ‘चांद्रयान-3’चा आतापर्यंतचा प्रवास

14 जुलै रोजी, ‘चांद्रयान-3’ 170 कि.मी. x 36,500 कि.मी.च्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.
15 जुलै रोजी, प्रथमच कक्षा 41,762 कि.मी. x 173 कि.मी. इतकी वाढवण्यात आली.
17 जुलै रोजी, कक्षा दुसर्‍यांदा 41,603 कि.मी. x 226 कि.मी. इतकी वाढवण्यात आली.
18 जुलै रोजी, कक्षा तिसर्‍यांदा 51,400 कि.मी. x 228 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.
20 जुलै रोजी, कक्षा चौथ्यांदा 71,351 x 233 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली.
25 जुलै रोजी, कक्षा पाचव्यांदा 1,27,603 कि.मी. x 236 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.
31 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान मध्यरात्री चंद्राने पृथ्वीची कक्षा सोडली.

हेही वाचा:

Back to top button