कोपरगावात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद | पुढारी

कोपरगावात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शहर पोलिसांनी 6 चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून 5 मोटारसायकली जप्त केल्या. मोटार सायकल सर्व चोरटे तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह मोटारसायकली विकत घेणार्‍यांनाही आरोपी केले आहे. कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला (दि.24 मे) रोजी सागर धनिशराम पंडोरे (रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) यांनी मोटारसायकल नं. ( MII 17 CG 1134) चोरी गेल्याची तक्रार दिली होती. त्या अनुशंगाने शहर पोलिस ठाण्यात गुरनं. 255/2023 भादंवी कलम 379 प्रमाणे दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना शहर पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोपरगाव येथून चोरीस गेलेली दुचाकी वाहने ही (सिन्नर, जि. नाशिक) भागामध्ये विकली आहेत.

माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयीत आरोपी व वाहनांचा शोध घेतला असता, संशयीत गणेश जेजुरकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने दोन साथीदार दिनेश राजेंद्र आहेर (वय 30 वर्षे, रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) व अजित कैलास जेजुरकर (वय 24 वर्षे, रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) यांच्या मदतीने मोटारसायकल चोरल्याचे कबुल केल्याने या दोन संशयीत इसमांना तत्काळ ताब्यात घेतले.

दरम्यान, या तिन्ही आरोपींकडे मोटारसायकल चोरीच्या अनुशंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी 5 मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या मोटारसायकल (शिरपूर, जि. धुळे) येथे विकल्याची माहिती दिल्याने प्रविण सुका कोळी (वय 32 वर्षे), प्रमोद झुंबरलाल कोळी (वय 23 वर्षे), हर्षल राजेंद्र राजपुत (वय 23 वर्षे, तिन्ही रा. उपपिंड, ता. शिवपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेत त्यांनी विकत घेतलेल्या मोटारसायकल गुन्ह्याच्या तपासात जप्त केल्या.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण 6 आरोपी अटक केले. त्यांच्याकडुन चोरलेल्या 5 मोटार सायकल जप्त केल्या आहेत. दोन मोटारसायकल आरोपींनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतुन, 2 मोटारसायकल कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन तर 1 मोटारसायकल येवला ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतून चोरली. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. रामराव ढिकले, पो. स. ई. रोहिदास ठोंबरे, भरत दाते, पोहेकाँ डी. आर. तिकोने, ए.एम. दारकुंडे, महेश गोडसे, जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मासाळ, एम.आर.फड, बाळु घोंगडे, राम खारतोडे व जी.व्ही. काकडे यांनी यशस्वी केली.

चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. या आरोपींकडून मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे सर्रास होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

नगर : सायबर गुन्ह्यांबाबत सावधगिरी बाळगा

माणुसकी हरवली ! अपघातानंतर मदत करण्याऐवजी लोक काढत राहिले फोटो

 

Back to top button