Stock Market Crash | ब्लडबाथ! सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या ३.५६ लाख कोटींचा चुराडा | पुढारी

Stock Market Crash | ब्लडबाथ! सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांच्या ३.५६ लाख कोटींचा चुराडा

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज बुधवारी भारतीय शेअर बाजार कोसळला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी घसरून ६५,४३१ पर्यंत खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ६७६ अंकांच्या घसरणीसह ६५,७८२ वर बंद झाला. तर निफ्टी २०७ अंकांनी घसरून १९,५२६ वर स्थिरावला. देशांतर्गत निर्देशांकांतील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ३.५६ लाख कोटींचा फटका बसला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आधीच्या ३०६.८० लाख कोटींवरुन ३०३.२४ लाख कोटींवर आले. (Stock Market Crash)

ऑटो, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, पॉवर आणि मेटल प्रत्येकी २ टक्क्यांनी, तर हेल्थ केअर, आयटी, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरल्याने सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १.५ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, भारतीय रुपया ३२ पैशांनी घसरून ८२.५८ प्रति डॉलरवर बंद झाला.

अमेरिका तसेच युरोझोन आणि चीनच्या कमकुवत आर्थिक डेटाने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. यामुळे दोन्ही निर्देशांक घसरले. आज बाजारात चौफेर विक्रीचा मारा दिसून आला. मुख्यतः ऑटो, मेटल आणि पीएसयू बँकिग क्षेत्रात अधिक विक्री दिसून आली. ऑटोमोबाईल्स, बँका, एफएमसीजी, पॉवर, आयटी, मेटल आणि फार्मा यासह सर्व क्षेत्रांना तोटा सहन करावा लागल्याने बाजारातील कमकुवत स्थिती व्यापक राहिली.

‘हे’ हेवीवेट शेअर्स घसरले

सेन्सेक्स आज ६६,०६४ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,४३१ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर वगळता सर्व क्षेत्रात घसरण दिसून आली. टाटा मोटर्सचा शेअर ३.६९ टक्क्यांनी घसरून ६१९ रुपयांवर आला. टाटा स्टीलचा शेअर ३.४५ टक्के घसरून ११८ रुपयांवर आला. एनटीपीसी (-२.८६ टक्के), बजाज फिनसर्व्ह (-२.८७ टक्के), एसबीआय (-२.२७ टक्के), जेएसडब्ल्यू स्टील (-२.२६ टक्के), ॲक्सिस बँक (-२ टक्के), एलटी (-१.८२ टक्के), कोटक बँक (-१.५५ टक्के), पॉवर ग्रिड (-१.४१ टक्के), भारतीय एअरटेल (-१.५१ टक्के), विप्रो (-१.३४ टक्के), एम अँड एम (-१.२८ टक्के), रिलायन्स (-१.२६ टक्के), एचडीएफसी बँक (-१.२४ टक्के), बजाज फायनान्स (-१ टक्के), मारुती (-१.१० टक्के), इंडसइंड बँक (-१.१० टक्के), एचसीएल टेक (-१.०४ टक्के), इन्फोसिस (-०.७१ टक्के) हे शेअर्स घसरले.

हिरो मोटोकॉर्पवर विक्रीचा दबाव

हिरो मोटोकॉर्प शेअरवर सलग दुसऱ्या दिवशी दबाव दिसून आला. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) Hero MotoCorp चे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या निवासस्थानी छापे टाकले. परिणामी हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स घसरले. या शेअर्सवर आज विक्रीचा तीव्र दबाव दिसून आला. निफ्टी ५० वर हा शेअर सर्वाधिक ३ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Crash)

जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला फिच या जागतिक दर्जाच्या रेटिंग एजन्सीने मोठा धक्का दिला. Fitch ने यूएस क्रेडिट रेटिंग AAA वरून AA+ वर आणले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेवरील कर्जात कमालीची वाढ झाली. त्यात अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात आणखी दरवाढीचे संकेत दिल्याने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता पसरली आहे. अमेरिकेतील शेअर बाजार मंगळवारी घसरून बंद झाले. एस अँड पी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज, नॅस्डॅक हे निर्देशांक घसरले. अमेरिकेच्या बाजारातील या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातही घसरण झाली. जपानचा बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक (benchmark Nikkei 225) २.३० टक्क्यांनी घसरला. या निर्देशांकांची या ‍वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.१ टक्के, हाँगकाँगचा हँग सेंग १.५ टक्के घसरला, तर शांघाय कंपोझिट ०.५ टक्के खाली आला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

यंदाच्या आर्थिक वर्षात (FY24) भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १.५ लाख कोटी ओतले होते. पण गेल्या काही दिवसांत ते भारतीय बाजारातून बाहेर पडताना दिसत आहेत. FII ने गेल्या सत्रात ९२ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. NSE डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी निव्वळ आधारावर ९२.८५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,०३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

बाजारातील घसरणीची ‘ही’ आहेत कारणे

  • फिचने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केले
  • अमेरिकेसह चीनमधील कमकुवत आर्थिक स्थिती
  • अमेरिका, युरोपसह आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा
  • डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण
  • हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार विक्री

हे ही वाचा :

Back to top button