देशाला यशस्वी बनवण्याची शक्ती केवळ शिक्षणातच : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

देशाला यशस्वी बनवण्याची शक्ती केवळ शिक्षणातच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.२९) दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम अर्थात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र परिसरात (आईसीसी) अखिल भारतीय शिक्षण बैठकीचे उद्घाटन केले. पंतप्रधांनानी ‘पीएम श्री योजने’ अंतर्गत शाळांसाठीच्या निधीचा पहिला हफ्ता देखील जारी केला. यावेळी संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, देशाला यशस्वी बनवण्याची शक्ती केवळ शिक्षणातच आहे. २१ व्या शतकात भारताने जे लक्ष निश्चित केले आहेत, त्यात शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व बरेच मोठे आहे. विद्येकरीता सल्लामसलत, शिक्षणासाठी संवाद आवश्यक आहे. अखिल भारतीय शिक्षण बैठकीच्या पहिल्या सत्रातून आपण सल्लामसलत आणि विचारांची आपली परंपरा पुढे घेवून जात आहे, याचा आनंद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काशीच्या नवनिर्मित रुद्राक्ष सभागृहात यापूर्वी हा कार्यक्रम झाला होता. आता हा कार्यक्रम दिल्लीतील नवनिर्मित भारत मंडपममध्ये होत आहे ही बाब आनंदाची आहे. काशीच्या रुद्राक्षपासून या आधुनिक भारत मंडपमपर्यंत अखिल भारतीय शिक्षण बैठकीच्या या यात्रेत एक संदेश दडला आहे. हा संदेश प्राचीन आणि आधुनिकतेचे संगम आहे. एकीकडे भारताची शिक्षण व्यवस्था देशाची प्राचीन पंरपरेचे जतन करीत आहे. तर दुसरीकडे विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील आपण तेवढ्याच वेगाने वाटचाल करीत आहोत.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.देशातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ तसेच शिक्षकांनी या धोरणाला एका मिशन प्रमाणे स्वीकारत पुढे वाढवले आहे. युगपरिवर्तन होत असतांना वेळ लागतो. ३ वर्षांपूर्वी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा करतांना एक मोठा कार्यक्षेत्र आम्हच्या समोर होता. पंरतु, सर्वांनी एनईपी लागू करण्यासाठी कर्तव्यभाव आणि समर्पण दाखवले.खुल्या मनाने, नवीन विचाराने तसेच प्रयोगाचा स्वीकार करण्याचे साहास दाखवले. ही बाब नव विश्वास निर्माण करणारी आहे,असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button