manipur violence : विरोधी पक्षांचे खासदार मणिपूरमध्ये दाखल; रविवारी राज्यपालांची भेट घेणार | पुढारी

manipur violence : विरोधी पक्षांचे खासदार मणिपूरमध्ये दाखल; रविवारी राज्यपालांची भेट घेणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधील (manipur violence) इम्फाळ खोऱ्यात मैतई समुदाय आणि कुकी समाजामध्ये वांशिक संघर्ष सुरू झाला आहे. या दोन समाजामध्ये आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ आज (दि. २९) मनिपूरमध्ये दाखल झाले आहे. रविवारी ते राज्यपाल यांची भेट घेऊन शांतता प्रस्थापित करण्याासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रविवारी सकाळी विरोधी खासदारांचे शिष्टमंडळ राजभवन येथे राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेईल. यावेळी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चालू परिस्थिती आणि संभाव्य उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे एमपीसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. (manipur violence)

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव शिष्टमंडळातील खासदारांचे दोन गट केले आहेत. खासदार इंफाळहून हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला जातील. केवळ एक हेलिकॉप्टर उपलब्ध असल्याने हेलिकॉप्टर त्यांना घेऊन जाण्यासाठी दोन फेर्‍या करेल, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि इतरांचा समावेश असलेला एक गट प्रथम चुरचंदपूरला पोहोचेल आणि चुरचंदपूर कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये उभारलेल्या मदत शिबिराला भेट देईल. तर लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आणि इतरांचा समावेश असलेला आणखी एक गट तेथे जाईल आणि चुराचंदपूर येथील डॉन बॉस्को शाळेतील मदत शिबिराला भेट देईल, असे मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूत्रांनी सांगितले.

इम्फाळला परतल्यानंतर, चौधरी यांच्या नेतृत्वाखालील गट बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग कॉलेजमधील दुसर्‍या मदत शिबिरात मैतई समुदायातील पीडितांना भेटण्यासाठी जाईल. तर विरोधी खासदारांचा दुसरा गट इंफाळ पूर्व जिल्ह्यातील अकमपट येथे आयडियल गर्ल्स कॉलेजच्या मदत शिबिरात जाईल आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लांबोईखोंगंगखॉंग येथे दुसर्‍या शिबिराला भेट देईल. त्यानंतर रविवारी दुपारी खासदार राजधानी दिल्लीला परतणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button