

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असून बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे सर्वेक्षण केले जाऊ नये, असे आदेश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले.
जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आक्षेप घेत मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांना उच्च न्यायालयात अपील करण्याचे निर्देशही दिले आहेत. हिंदू मंदिर तोडून त्यावर मशीद बांधली आहे का? याचा शोध घेण्यासाठी ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक पध्दतीने सर्वेक्षण केले जावे, असे आदेश जिल्हा न्यायालयाने पुरातत्व खात्याला गत आठवड्यात दिले होते. दरम्यान सदर प्रकरणावर उच्च न्यायालयाने 26 जुलैला सुनावणी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ज्ञानवापी मशिद परिसरात घाईगडबडीने कोणतेही काम केले जात नसल्याचे साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयास सांगितले. सध्याच्या सि्थतीत मशिद व परिसराची छायाचित्रे घेणे, मोजमाप घेणे आदी कामे केली जाणार आहेत. तेथील एक वीटही तूर्तास हलवली जाणार नसल्याचे मेहता यांनी नमूद केले. .