भय इथले संपत नाही... मणिपूरमधील हिंसाचाराची धग मिझोराममध्‍ये! नेमकं काय घडलं? | पुढारी

भय इथले संपत नाही... मणिपूरमधील हिंसाचाराची धग मिझोराममध्‍ये! नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमध्‍ये दोन महिलांची विवस्‍त्र धिंड काढण्‍याच्‍या प्रकाराने देशभरात संतपाची लाट उसळली आहे. या हिंसाचाराचा परिणाम आता मिझोरामवरही होताना दिसत आहे. मिझोराममधील मैतेई समुदायाच्‍या लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. सर्व परिस्थिती पाहता मणिपूर सरकारनेही लोकांना हवाई मार्गाने आणण्याची तयारी सुरु केली आहे. ( Manipur Horrific Videos )

 मिझोराममधून मैतेई समुदाय का करत आहे स्‍थलांतर?

मिझोराममध्‍ये राहणार्‍या मिझो लोकांचे मणिपूरच्‍या कुकी आणि झोमी जमातीचे जातीय संबंध आहे. मणिपूरमध्‍ये ज्‍या महिलांवर अत्‍याचार झाला त्‍या कुकी आणि झोमी जमातीच्‍या होत्‍या. अत्‍याचाराचा व्‍हिडिओ समोर आल्‍यानंतर मिझो नॅशनल फ्रंट या फुटीरवादी संघटनेची सहायक संघटना पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ने एक निवेदन जारी केले. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, ‘मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाच्या लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी मिझोराम राज्‍य तत्‍काळ सोडावे. मणिपूरमधील घटनेमुळे मिझो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत मिझोराम आता मैतेई लोकांसाठी सुरक्षित नाही.” या निवदेनामुळे मिझोराममधील मैतेई समुदायातील नागरिकांमध्‍ये प्रचंड दहशत पसरली आहे.

Manipur Horrific Videos : दोन हजार मैतेई भयाच्‍या छायेखाली

मिझोराम राज्‍यात सुमारे दोन हजार मैतेई समुदायाचे लोक राहतात. ‘पीएएमआरए’च्‍या इशारावजा धमकीनंतर मिझोराममध्ये मैतेई समुदायामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. विशेषत: महिला आणि मूले दहशतीच्‍या छायेखाली आहेत. त्‍यामुळे मिझोराममधून मणिपूर येण्‍यासाठी एकच गर्दी उसळली आहे. मिझोराममध्‍ये मैतेईचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. तरीही मिझोराममधून लोक स्थलांतरित होत आहेत. मणिपूर सरकारनेही जारी केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेई समुदायाच्या लोकांच्या संपर्कात आम्‍ही आहोत. त्यांच्‍या स्‍थलांतरासाठी राज्य सरकार चार्टर्ड विमान पाठवण्‍याच्‍या तयारीत आहे.

तब्‍बल १२ हजार कुकी आणि झोमींनी घेतला मिझोराममध्‍ये आश्रय

मागील तीन महिन्‍यांहून अधिक काळ मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. मैतेई विरुद्‍ध कुकी हा संघर्षाने टोक गाठले आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापासून कुकी आणि झोमी जमातीच्या १२ हजारांहून अधिक लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button