मणिपुरात आणखी दोन महिलांची सामूहिक बलात्कार करून हत्या | पुढारी

मणिपुरात आणखी दोन महिलांची सामूहिक बलात्कार करून हत्या

इंफाळ, वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये आणखी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची अतिशय निर्घृण हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

16 मे रोजी एका पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद नोंदविली होती. दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्यादिवशीच या दुसर्‍या दोन महिलांवरही सामूहिक बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. 21 आणि 24 वर्षीय या महिला आहेत. पीडिता एका कार वॉशिंग कंपनीत काम करीत होत्या. जमावातील काही तरुणांनी त्यांना कंपनीतील एका खोलीत नेेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

महिलांनी ओरडू नये, यासाठी त्यांच्या तोंडात बोळा घातला होता. दोघींवर अमानुष अत्याचार केला होता. त्यांचे केसही कापून टाकले होते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांना सॉ मिलच्या निर्जन परिसरात टाकले होते. कार वॉशिंग कंपनीमध्ये काम करणार्‍या एका पुरुष सहकार्‍याच्या डोळ्यांसमोरच हा प्रकार घडला होता. प्रारंभी अब्रूला घाबरून पीडितेच्या घरातील लोकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मात्र, एका पीडितेच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

पोलिसांनी या घटनेचा दुजोरा दिला आहे. मात्र, पीडितांचे मृतदेह अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले. व्हायरल व्हिडीओ प्रकरणातील पीडितांची तक्रार सैकूल पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्याच ठाण्यामध्ये या दोन पीडितांबाबतची तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोरोंपत पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

Back to top button