Manipur Assault: विरोधकांची लोकसभेत राडेबाजी; मणिपूर विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंग | पुढारी

Manipur Assault: विरोधकांची लोकसभेत राडेबाजी; मणिपूर विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील घटनेवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे निवेदन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत केले. मात्र त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी पक्षांनी सदनात (Manipur Assault) गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

मणिपूरमध्ये (Manipur Assault) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन यावर उत्तर द्यावे, असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्या झाल्या विरोधकांनी हा मुद्दा उपसि्थत केला. सर्व कामकाज बाजुला ठेवून या मुद्यावर चर्चा घेतली जावी व चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी  मागणी विरोधी पक्षांनी केली. तथापि अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याला अनुमती दिली नाही.
गोंधळातच राजनाथ सिंग यांनी निवेदन केले. मणिपूरच्या विषयावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे, पण विरोधक या मुद्यावर गंभीर दिसत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. गदारोळामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी 12 आणि नंतर अडीच वाजेपर्यंत तहकूब केले. शून्य प्रहराचे कामकाज राडेबाजीमुळे वाया गेले. ‘प्रधानमंत्री सदन मे आओ’, ‘प्रधानमंत्री जवाब दो, जवाब दो’… अशा घोषणा काॅंग्रेस, द्रमुक, डाव्या पक्षांसह अन्य विरोधकांनी दिल्या.

Back to top button