मोदी म्‍हणतात, मी एकटाच विरोधकांवर भारी; मग रालोआची बैठक का बोलवली?: खर्गेंचा सवाल | पुढारी

मोदी म्‍हणतात, मी एकटाच विरोधकांवर भारी; मग रालोआची बैठक का बोलवली?: खर्गेंचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणतात की मी एकटाच विरोधी पक्षांवर भारी आहे; मग भाजप नेतृत्त्‍वाखालील रालोआची बैठक का बोलवली, असा सवाल काँग्रेस अध्‍यक्ष मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी केला. बंगळूरमध्‍ये विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या बैठकीपूर्वी ते माध्‍यमांशी बोलत होते. (Bengaluru Opposition meet)

या वेळी खर्गे म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्‍यसभेत बोलताना म्‍हणाले होते की, मी सर्व विरोधकांवर एकटा भारी आहे. मला याचे आश्‍चर्य वाटते. जर पंतप्रधान मोदी हे एकटेच विरोधकांवर भारी असतील तर मंगळवारी ( दि.१८ ) दिल्‍ली येथे ‘रालोआ’ची बैठकीत ३० राजकीय पक्षांच्‍या प्रतिनिधींना का बोलावत आहे. किमान त्या ३० पक्षांची नावे तरी सांगा, असे आवाहन करत भाजप बंगळूर येथे होणार्‍या विरोधी पक्षांच्‍या भेटीबद्दल चिंताग्रस्त आहे, असेही खर्गे म्‍हणाले. ( Bengaluru Opposition meet )

 Bengaluru Opposition meet : बैठकीत २६ विरोधी पक्ष सहभागी होणार

बंगळूर येथे हाेणार्‍या बैठकीपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, विवेक तंखा आणि डीके शिवकुमार यांनी आज  ( दि. १७) संयुक्‍त पत्रकार परिषद घेतली. या बैठकीला २६ विरोधी पक्ष सहभागी होतील, असा दावा के. सी. वेणुगोपाल यांनी केली. काँग्रेस पक्षाचे सर्व नेते बंगळूरला पोहचले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधीही बैठकीला उपस्‍थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांनी आज संध्याकाळी विरोधी पक्षांना डिनरचे निमंत्रण दिले आहे. उद्या बैठक होणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “बंगळूरमधील बैठकीसाठी जे नेते आज येत नाहीत ते उद्या येतील. मंगळवारी सकाळी ११ वाजता बैठक सुरू होणार असून सर्व पक्षांचे नेते दुपारी ४ वाजता देशाला संबोधित करतील.”

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शरद पवार आज बेंगळुरूमध्ये येणार नाहीत. दोघेही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळेही येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बैठकीत तीन प्रमुख मुद्यांवर होणार चर्चा

विरोधी पक्षांच्‍या बैठकीत तीन प्रमुख मुद्‍यांवर चर्चा होणार आहे. यामध्‍ये लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांची एकजूट, जागावाटपावर एकमत आणि संयुक्‍त पुरोगामी आघाडी नावात बदलाबाबतही चर्चा होणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button